रत्नागिरी तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी १५४ कोटी

मिऱ्या, शिरगावसह ३४ गावे ; मंत्री सामंत यांचे प्रयत्न यशस्वी

रत्नागिरी:- तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने मंत्री उदय सामंत यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. मिऱ्या, शिरगावसह ३४ गावांच्या पाणीयोजनेसाठी १५४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबद्दल सामंत यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. या पाणीयोजनांमुळे तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दूर होण्यास मदत होणार आहे.

रत्नागिरी तालुक्यातही उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई होते. गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. टॅंकर मिळवण्यासाठी राजकीय प्रतिनिधींना हाताशी धरून त्या वाडीला किंवा गावाला तहसीलदारांच्या अहवालानंतर मंजुरी मिळते. जिल्हा परिषद टंचाई आराखड्यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करतात; मात्र पाणीटंचाई काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे रत्नागिरी मतदार संघ तरी पाणी टंचाईमुक्त व्हावा यासाठी मंत्री उदय सामंत यांचा प्रयत्न असायचा. प्रत्येक टर्मला त्यांनी टंचाईग्रस्त गावे घेऊन त्या-त्या ठिकाणी पाणीयोजना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे ५० टक्के पाणीटंचाई दूर करण्यात त्यांना यश आले. त्यांनी रत्नागिरी तालुका टंचाईमुक्त करण्याचा निर्धार सोडला असून त्या अनुषंगाने त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

तालुक्यातील ३४ गावांसाठीच्या पाणीयोजना राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने मंजूर केल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील मिऱ्या, शिरगावसह २४ गावांच्या नळपाणी योजनेसाठी  १२१ कोटी निधी तर जयगड उर्वरित नळपाणी योजनेसाठी ३३ कोटी असा एकूण  १५४ कोटी रुपयांच्या निधीला आज मान्यता मिळाली. मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून त्यामुळे तालुक्यातील ३४ गावांची तहान लवकरच भागणार आहे.