रत्नागिरी:- वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी प्रभावी ठरलेल्या जपानी मियावाकी तंत्राचा जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव बनवण्यात आला असून नाणिज-खानू देवराईजवळ सुमारे १० गुंठे जागेवर देशी-विदेशी नाही तर स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत. १६ लाखाचा हा प्रस्ताव असून सामाजिक वनीकरण विभागाने तो मंजुरीसाठी प्रशासनाला सादर केला आहे.कमी जागेत उभारणार घनदाट जंगल ऊभारण्याची ही पद्धत आहे.ही झाडे एकमेकांशी स्पर्धा करत नसल्याने तेथे दाट झाडी तयार होते.
राज्यात मुंबईसह जालना, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नांदेड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर जपानी मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून घनदाट वृक्ष लागवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून सागरी भागात असलेली खारफुटीची जंगले नष्ट होऊ लागली असून, तेथे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम होऊ लागले आहे. काही ठिकाणच्या भागात असलेला हरितपट्टाही अतिक्रमणामुळे नष्ट होऊ लागला आहे.यावर मात करण्यासाठी आता प्रशासनाने जपानी पद्धतीचे “मियावाकी’ तंत्रज्ञान वापरून वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या मियावाकी पद्धतीमध्ये अगदी कमी जागेत अधिक झाडांची लागवड केली जाते. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनिकरण विभागाने जिल्ह्यातील जपानी मियावाका तंत्रज्ञानाचा पहिला प्रस्ताव तयार केला आहे. खानू येथील वनराईच्या जवळपास ही जागा आहे. यामध्ये विविध प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे. वाढीसाठी लागणाऱ्या ऊन, पाण्यासाठी ती झाडे एकमेकांशी स्पर्धा करणार नाही. त्यामुळे सर्वच झाडांची चांगली वाढ होऊन घनदाट जंगल तयार होते.
मुंबई महापालिका विविध सामाजिक सेवाभावी संस्थांच्या मदतीने मुंबई शहर आणि उपनगरात मियावाकी पद्धतीचे जंगल उभे करत आहे.
मियावाकी पद्धत शहरांमध्ये खूप परिणामकारक आहे. शहरांत जागा कमी असते, परिणामी पारंपरिक पद्धतीने झाडे लावायची म्हटली तर फार कमी झाडे लावता येतात. शिवाय अशी झाडेदेखील वाढण्यास वेळ लागतो. आपल्याला लगेच परिणाम हवे असतील तर मियावाकी पद्धत उपयोगी आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मियावाकी पद्धत फार उपयोगी पडणार आहे.
शास्त्रज्ञाच्या नावावरून पडले नाव
वनाचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणासाठी पृथ्वीवरील वनावरण वाढवणे आवश्यक आहे. मात्र, जागा कुठे आहे. त्यामुळेच उपलब्ध कमी क्षेत्रामध्ये जास्त वृक्षांचे आवरण आणि घनवन निर्माण करण्याचा प्रयोग जपानमध्ये मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरू केला. तेथे तो चांगलाच यशस्वी ठरला. त्यानंतर जगभर तो प्रयोग आपलासा केला गेला.
नाणीज-खानू येथे दहा गुंठे जागेवर मियावाकी पद्धतीचा घनदाट जंगलाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला आहे; मात्र अजून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. १६ लाखाचा हा प्रस्ताव असून प्रदूषण नियंत्रणाच्यादृष्टी फायदेशीर ठरणार आहे. स्थानिक विविध प्रजातीची झाडे यामध्ये लावण्यात येणार आहेत.
–प्रियंका लगड, सामाजिक वनीकरण अधिकारी









