रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांची 484 पदे रिक्त

रत्नागिरी:- शिक्षक भरतीकडे झालेले दुर्लक्ष, सेवा निवृत्तांची वाढलेली संख्या, आंतर जिल्हा बदल्यामुळे कोकणातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे दिवसेंदिवस वाढतच आहेत. जिल्हानिहाय रिक्त पदांचे रोस्टर जाहीर झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात 484 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. कोकणातील पाच जिल्ह्यांत मराठी माध्यमाची 5 हजार पदे रिक्त आहेत.

शालेय शिक्षणात ही भीषण परिस्थिती असतानाच विविध ठिकाणी शिक्षकांना ई-पीक पाहणी करणे, वाहतूक नियोजन करणे, चहापान व्यवस्था आदी कामे करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कोकणात इंग्रजी, गणितासारख्या महत्त्वाच्या विषयांना शिक्षक नसल्याने शिक्षण मंत्र्यांच्या विभागातच शिक्षणाची पाटी कोरी राहण्याची भीती आहे. उर्दू माध्यमांच्या शाळांमध्येही शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. ठाणे जिल्ह्यात 36, रायगडमध्ये 84, पालघर जिल्ह्यात 57 तर रत्नागिरी 84 व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नुकत्याच आंतरजिल्हा बदल्या पार पडल्या. त्यासाठी शिक्षकांचे जिल्हानिहाय रिक्त पदांचे रोस्टर जाहीर करण्यात आले होते. शिक्षक भरतीला लागलेल्या ब्रेकमुळे ही परिस्थिती ओढवली असल्याची टीका डीटीएड, बीएड पात्रताधारक शिक्षकांमधून होत आहे.

आरटीई अंतर्गत नियमाप्रमाणे 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य असताना विद्यर्थी शिक्षकाविना शिक्षण घेत असल्याचे चित्र आहे. शिक्षक भरतीचे शिक्षण संस्थांचे अधिकार काढून घेत तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टल माफत शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आजही कायम आहे. मात्र, शिक्षक भरतीचे पवित्र पोर्टलच गेली दोन वर्षे बंद आहे. परिणामी, शिक्षकांची पदे रिक्तच राहिली आहेत. एका बाजूला टीईटी घोटाळा प्रकरणामुळे शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत. तर दुसरीकडे पोर्टल बंद असल्याने शिक्षक भरती बंद आहे. याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील शाळांना सहन करावा लागत आहे. अलीकडेच राज्य सरकारने एमपीएससीमाफत शिक्षक भरती होणार असल्याचेही सांगितले होते. मात्र, याबाबतही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. परिणामी सरकारच्या धरसोड धोरणामुळे शिक्षक भरती प्रक्रिया पेचात पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण शिक्षकांविना सुरू आहेत.