जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली माहिती
रत्नागिरी:- गतवर्षीपेक्षा या आर्थिक वर्षात २३८ गुन्हे घटले आहेत. घटलेल्या गुन्ह्यांमध्ये घरफोडी, चोरी, दंगा, आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. क्युआर कोडद्वारे पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांमध्ये घट होण्यात मदत झाली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
जिल्हा पोलिस दलाच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी पत्रकारांसमोर मांडला. ते म्हणाले की, यावर्षी क्युआर कोडद्वारे पेट्रोलिंग या योजनेमुळे गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. खासगी व्यावसायिक आणि सरकारी आस्थापना यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार खासगी ३१२१ कॅमेरे बसविण्यात आले. त्यामुळे एकूण १३८८ दाखल गुन्ह्यांपैकी ११२१ गुन्हे उघड होण्यास मदत झाली असून, ८० टक्के गुन्हे उघड झाले आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे प्रयत्न असल्याचे सांगितले.
आर्थिक गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, त्यासाठी सातत्याने जिल्हा पोलिस दल जनजागृतीपर कार्यक्रमांवर भर देत आहे. यात काही आरोपी परराज्यात, तर काही परदेशात राहून गुन्हेगारी करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, हाच महत्त्वाचा मार्ग आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असतो, असेही पोलिस अधीक्षक यांनी सांगितले. तसेच गुन्ह्यांमध्ये आरोपीचा माग काढण्यासाठी डाॅग स्काॅडचा महत्त्वाचा उपयोग होत असल्याचे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.