रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदार सुरुवात

रत्नागिरीः– जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 24) मोसमी पावसाला चांगली सुरुवात झाली असून बळीराजा सुखावला आहे. पहिल्याच पावसात रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मोरी खचली तर, आंबा घाटात मोठा दगड कोसळून मंदिराचे नुकसान झाले. पावस मार्गावरील सातपर्‍या येथील पुलावरुन पाणी गेल्यामुळे वाहतूक थांबली. मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.

शुक्रवारी सकाळी 8.30 वाजपर्यंतच्या मागील चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 16.56 मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड 5, दापोली 13, खेड 11, गुहागर 11, चिपळूण 10, संगमेश्‍वर 24, रत्नागिरी 7, लांजा 28, राजापूर 40 मिमी नोंद झाली. 1 ते 24 जुन या कालावधीत जिल्ह्यात सरासरी 62 मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात शुक्रवारी काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडल्या; मात्र शनिवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला आरंभ झाला. वेगवान वार्‍यासह सर्वच तालुक्यात दिवसभर थांबून थांबून सरी कोसळत होत्या. जुन महिन्यात मोसमी पावसाने पाठ फिरवल्यामुळे उष्म्याने नागरिक त्रस्त झाले होते. आज पडलेल्या पावसाने दिलासा मिळाला. पहिल्या पावसाचा फटका रत्नागिरी-कोल्हापूर आणि मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामाला बसला. आंबा घाटात मोठा दगड मंदिरावर कोसळले. यामध्ये देवळाचे नुकसान झाले. मात्र आतील श्रींची मुर्ती व्यवस्थित होती. साखरपा मेढे येथे मोरी खचली, चिपळूणात पाणी साचल्याने वाहने चालवताना अडथळे निर्माण झाले होते. पावसाच्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य झाले होते. पावस सातपर्‍या येथे पुलावरुन तर मावळंगे येथे रस्त्यावर पावसाचे ेपाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सर्वच तालुक्यात पडलेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला. दुबार पेरणीचे संकट टळले असून पाणीटंचाईही दूर होणार आहे. रविवारपासून गावागावात नांगरणीसह भात पेरणीच्या कामाला सुरवात होणार आहे.

जयगड मंडळातील सतकोंडी गावातील श्रीमती. दीप्ती नितीन काताळे यांचे घरावर वीज पडून त्या जखमी झालेल्या आहेत. त्यांना रत्नागिरी येथे जिल्हा रुग्णालायात दाखल करणेत आलेले आहे. तसेच त्यांचे घराचे नुकसान झाले आहे. तसेच घरातील संपूर्ण वायरिंग जळाले आहे तसेच अन्य साहित्याचे देखील नुकसान झाले आहे.