रत्नागिरी:- हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यामुळे मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर संगमेश्वरमधील शास्त्री आणि राजापूरमधील कोदवली नदीनेही इशारा पातळी गाठली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या संभाव्य धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अनुचित घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
या सुट्टीचा लाभ अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, तसेच सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.