रत्नागिरी:- रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे समुद्रात शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळल्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 41 लँडिंग पॉईंटवर पोलिसांनी ‘वॉच’ ठेवला आहे तर किनारपट्टी भागातील पोलीस स्थानकाअंतर्गत कडक नाकाबंदी सुरू असून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. तर समुद्रात कोस्टगार्ड, पोलीस यांच्याकडून नौकांची कसून तपासणी सुरू असून तटरक्षक दलामार्फत जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हेलिकॉप्टरद्वारे गस्त घालण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या किनारपट्टीवर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नव्हती.
हरिहरेश्वर नजिकच्या समुद्रात लेरिहान ही नौका आढळली होती. या नौकेत शस्त्रास्त्र असल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली, राज्याच्या गृहविभागाने किनारपट्टीवर हायअलर्ट जारी केल्यानंतर पोलीस, कोस्टगार्ड, तटरक्षक दल सतर्क झाले आहेत. तिन्ही यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रात गस्त घालण्याचे काम सुरू केले आहे.
हायअलर्ट आल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यातील प्रत्येक चेकपोस्टवर कडक नाकाबंदी सुरू केली आहे. नाकाबंदीतून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात असून डिकीत असलेल्या साहित्याची विशेष करून तपासणी केली जात आहे. तर जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये येणाऱ्या बोटींची तपासणी पोलीस, कस्टमकडून संयुक्तरित्या सुरू आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात कोस्टगार्डने दोन नौकांची तपासणी केली. त्या नौका परराज्यातून आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दोन्ही नौका मिरकरवाडा बंदरात उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. तर कस्टमची नौका त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवून होती. गुरूवारी दुपारी तटरक्षक दलामार्फत जिल्ह्याच्या किनारी भागात हेलिकॉप्टरद्वारे गस्त घालण्यात आली. तर बारा नॉटीकल क्षेत्रापर्यंत तटरक्षक दलाने आपला ‘वॉच’ कायम ठेवला आहे.
रायगडमधील हरिहरेश्वर येथील बोटीत रायफल सापडल्यानंतर जिल्ह्यात हायअलर्ट देण्यात आला आहे. सकाळपासून 41 लँडींग पॉईंटवर पोलिसांची गस्त कायम ठेवण्यात आली आहे. रत्नागिरीच्या सर्वच किनारपट्टीवर, जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या चेकपोस्टवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे.
हरिहरेश्वर येथे शस्त्रांनी भरलेली बोट तर दिघी भरतखोल येथे फुगवलेला लाईफ तराफा आढळला आहे. बोट आतून बंद करण्यात आली होती. तपासणी केल्यानंतर बोटीत तीन एके-47 व जीवंत काडतुसे आढळली आहेत. सर्व मच्छीमार व मच्छीमार संस्थांनी सतर्क रहावे. कोणालाही संशयास्पद वस्तू आढळल्यास मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त व्ही. एन. भादुले यांनी केले आहे.









