रत्नागिरी:-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. 17 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल. कोकण बोर्डातून एकूण 31 हजार 526 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 21 हजार 79 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यातून एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोरानामुळे प्रत्येक शाळेतच परीक्षा घेण्यात आली होती. यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुळे केंद्र 114 आणि उपकेंद्र 459 अशा एकूण 573 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 10 हजार 417 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार ते निकालादिवशी कळविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकर व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार 20 जून ते बुधवार 29 जून पर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार 20 जून ते शनिवार 9 जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.









