रत्नागिरी जिल्ह्यातील उष्णतेची लाट अद्यापही कायम

रत्नागिरी:- जिल्हावासियांना मे महिन्यात प्रचंड उन्हाचा कडाका सहन करावा लागला आहे. अजूनही कोकणातील पाचही जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. सुदैवाने उष्माघाताने त्रस्त झालेल्या एकाही नागरिकाची नोंद रत्नागिरीत झालेली नाही असे जिल्हा आरोग्य विभागाकडे सांगण्यात आले.

गेल्या तीन आठवड्यांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात येत असून, या वर्षात दुसर्‍यांदा कोकण किनारपट्टीलगत उष्णतेचे प्रमाण तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचे इशारे दिले जात आहेत. त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा पातळीवरील आरोग्य विभागाकडून मागील महिन्यातच आरोग्य केंद्र सज्ज ठेवली आहेत. वातानुकूलीत यंत्रणांनी सज्ज अशी खोली, औषधे, सलाईन, थंड पाणी उपलब्ध करुन ठेवण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त सुचनेनुसार दरदिवशी आरोग्य उपकेंद्रांकडून उष्माघाताचा रुग्ण आढळण्याची नोंद घेतली जात आहे. सुदैवाने जिल्ह्यात उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. दिवसाच नव्हे तर रात्रीही उष्णतेचा त्रास नागरिकांना जाणवत आहे. शहरी भागात याची तिव्रता अधिक असून वातानुकूलीत वस्तूंचा वापर अधिक वाढला आहे. हवामान विभागाच्या सुचनेनुसार अजुनही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव संपलेला नसल्याने सतर्क राहा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडूनही यंत्रणेला सुचना देण्यात आल्या आहेत.