सहकार क्षेत्रातील नामांकित संस्थांकडून बँकेला एकूण १४ पुरस्कार
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. तानाजीराव चोरगे यांनी घेतल्यानंतर राज्यातील दुसर्या क्रमांकाची बँक म्हणून ओळख कायम राखली आहे. शासनाचा सहकारनिष्ठ व सहकार भुषण पुरस्कारासह सहकार क्षेत्रातील नामांकित संस्थांकडून बँकेला एकूण १४ पुरस्कार मिळवले आहेत. त्यांना उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळते, असे कार्यकारी संचालक सुनिल गुरव यांनी बँकेच्या आढावा घेताना सांगितले.
बँकेचा ६४ वा वर्धापन दिन रविवारी (ता. ५) बँकेच्या प्रधान कार्यालयात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बँकेत श्री सत्यनारायण पुजा घालण्यात आली होती. यावेळी दुर्गामाता भगिनी भजन मंडळ, कर्ला येथील महिलांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. या निमित्ताने बँकेच्या कामाकाजाचा आढावा कार्यकारी संचालक सुनील गुरव यांनी मांडला. बँकेची स्थापना २४ मे १९५७ ला झाली; परंतु बँकेचे प्रत्यक्ष कामकाज ५ डिसेंबर १९५८ रोजी सुरू झाले. २००७ पासून ते आजपर्यंत बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा कृषिभुषण डॉ. तानाजीराव चोरगे हे सांभाळत आहेत. त्यांच्या अध्यक्ष पदाचे कालावधीत बँकेने फार मोठी प्रगती केली. बँक प्रगतीपथावर आहे. त्यात बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्यासह सर्व संचालक, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचाही मोलाचा वाटा आहे. बँकेला गेली १० वर्षे सलग ’अ’ ऑडिटवर्ग प्राप्त असून, एनपीएचे प्रमाण शुन्य टक्के आहे. कोवीड कालावधीत बँकेने जिल्हा रूग्णालयाला व्हेंटीलेटर खरेदीसाठी १३ लाख ३६ हजार रुपये, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अधिकारी, कर्मचारी यांचे एका दिवसाच्या वेतनातून ६ लाख ३९ हजार रुपये, जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता प्रत्येकी २५ लाख रुपये आर्थिक मदत दिली. कोरोना संक्रमणात निधन पावलेल्या बँक कर्मचार्यांकरीता प्रत्येकी ५ लाख रुपये आणि प्राथमिक शेती संस्थांच्या सचिवांकरीता २ लाख याप्रमाणे एकूण १२ लाखाची आर्थिक मदत मयतांच्या वारसांना दिली. तौक्ते चक्रीवादळात संगमेश्वर तालुक्यातील आपदग्रस्तांना ३,२५,००० रुपये, राजापूर तालुक्यातील आपदग्रस्तांना ३६ हजार रुपये मदत दिली. बँकेने सीबीएस प्रणालीत कामकाज करण्यास सुरूवात केली असून विविध अत्याधुनिक सेवा पुरविल्या आहेत. मोबाईल एटीएम व्हॅन सुविधेने पुरपरिस्थितीमध्ये चांगली कामगिरी बजावली.