संगमेश्वर:- रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषदेवर दि . १२ रोजी पुन्हा एकदा धरणे आंदोलन छेडणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस कृष्णा होडे यांनी दिली आहे .
यापूर्वी २८ एप्रिल रोजी झालेल्या धरणे आंदोलनाच्या दिवशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा झाली होती . सीईओंनी योग्य ते मार्गदर्शन शासनाकडून घेऊन निर्णय देण्याचे आश्वासन दिले होते . परंतु जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या प्रभागामध्ये काहीच बदल केले गेले नाहीत किंवा निर्णयामध्ये देखील काहीच बदल केले नाहीत . केवळ ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची दिशाभूल करण्यात आल्याचे मत जिल्हाध्यक्ष किरण पांचाळ व जिल्हा सरचिटणीस कृष्णा होडे , जिल्हा उपाध्यक्ष संजय खताते यांनी व्यक्त केले आहे . यामुळे नाराजी व्यक्त होत आहे . दहा टक्केमध्ये वंचित ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना परत संधी देण्याची मागणी करण्यासाठी १२ रोजी सकाळी १० वाजता जि . प . रत्नागिरी येथे कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत.