रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ पालिकांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून अंतिम अधिसूचना ५ एप्रिलला निघणार आहे.त्यानंतर आरक्षण व इतर सोपस्कार आटपेपर्यंत पावसाळा तोंडावर येणार आहे. पावसात निवडणुका घेण्याचे टाळले तर निवडणुकांसाठी गणपतीपर्यंत वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. यामुळे प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक हिरमुसले आहेत.
जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणुक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम प्रसिद्ध केला असून संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी २ मार्च पर्यंच जिल्हाधिकाऱ्यांकजे प्रारूप प्रभाग रचना सादर करायची आहे. याची अंतिम अधिसूचना ५ एप्रिलपर्यंत निघणार आहे. त्यात अजून आरक्षण न पडल्याने ही निवडणुक लांबण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणुक आयोगाने आजच यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड व राजापूर या चार पालिकांच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम २०२२ प्रसिध्द केला आहे. त्यानुसार संबंधित पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी २ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी यांचेकडे प्रारुप प्रभाग रचना सादर करायची आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्दी १० मार्च पर्यंत होईल. यासंदर्भात हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी १० ते १७ मार्च २०२२ पर्यत आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी २२ मार्च पर्यत जिल्हाधिकारी घेतील. जिल्हाधिकारी यांनी प्राप्त हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय राज्य निवडणूक आयुक्त यांचेकडे २५ मार्चपर्यत सादर करायचे आहे. राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्याचा कालावधी १ एप्रिल पर्यंत आहे. तसेच अंतिम अधिसूचना प्रसिध्दी देण्याचा कालावधी ५ एप्रिलपर्यंत आहे, असे नगरपालिका प्रशासन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.
पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्याची प्रतीक्षा अजून कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.
प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला असला तरी अजून आरक्षण पडलेले नाहीत. त्यानंतर निवडणुक कार्यक्रम लागणार असल्याने बहुतेक गणपतीनंतर ही निवडणुक होण्याची शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली.