रत्नागिरी:- निष्काळजीपणे टेम्पो चालवून इन्होव्हा कारला उजव्या बाजूस धडक देवून अपघात केला. या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज सुरेश वाढवे (वय २६, रा. पिंपरी गोडवाणा, नागपूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेचारच्या सुमारास बावनदी ते हातखंबा येणाऱ्या रस्त्यावरील कोकजेवठार येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोटार चालक मंदार भार्गव निमकर (वय ४०, रा.नारायणमळी, नाचणे, रत्नागिरी) हे मोटार (क्र. एमएच-0८-एएन- ३०२० ) मधून सोबत अजिंक्य मोरे ला घेऊन देवरुख ते आंबवमार्गे रत्नागिरी असे येत होते. त्याच सुमारास संशयित सूरज वाढवे यांनी टेम्पो (क्र. एमएच-४०, डीसी- २०३२ ) हा निष्काळजीपणे चालवून कोकजेवठार येथे मोटारीला धडक देवून अपघात केला. या प्रकरणी पोलिस हेड काँस्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









