रत्नागिरी:- आता एसटी प्रशासन भाड्याने गाड्या घेणार आहे. लवकरच एसटीच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाकडून ५० खासगी गाड्या किलोमीटरप्रमाणे भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. लांब पल्ल्यासाठी या गाड्यांचा वापर प्रायोगिक तत्त्वावर केला जाणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सी नेमली असून त्यावर त्यांचा चालक असणार आहे. देखभाल दुरुस्तीवरील खर्च कमी करण्यासाठीचा राज्यातील हा पहिला प्रयोग आहे.
एसटी महामंडळामधील या नव्या प्रयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. याचे परिपत्रक अजून आले नसले तरी त्यावर काम सुरू झाले आहे. एसटीच्या देखभाल दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. कोट्यवधी रुपये दुरुस्तीचाच खर्च आहे. कोरोना काळातील वर्ष आणि त्यानंतर पाच महिने झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जागेवर उभ्या असलेल्या सुमारे साडेआठशे गाड्यांचा मेंटेनन्स (देखभाल दुरुस्ती) करताना एसटी महामंडळाच्या नाकीनऊ आले. त्यानंतर सुटे पार्ट खरेदीचे कोट्यवधीचे पैसे थकल्याने टायरपासून अनेक पार्ट उपलब्ध न झाल्याने काही गाड्या वर्कशॉपमध्ये (कार्यशाळा) उभ्या होत्या. त्यासाठी अनेक प्रयत्न करून टप्प्याटप्प्याने एसटीला टायर मिळाले. ऑईल कंपन्यांतून थेट पेट्रोल खरेदीमध्येही एसटीला लिटरमागे जास्त पैसे मोजावे लागत असल्याने ती डिझेल खरेदीदेखील एसटीने थांबवली आहे. खासगी पेट्रोलपंपावर पाच ते आठ रुपये कमी दराने डिझेल खरेदी सुरू आहे. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी या बारीकसारीक खर्चांना कात्री लावण्याच्या दृष्टीने महामंडळाने हे पाऊल ऊचलले आहे.
प्रयोगिक तत्त्वावर रत्नागिरी एसटी विभागाला भाडेतत्त्वावरील ५० गाड्या मिळणार आहेत. या गाड्या एसटीच्या रंगसंगतीमध्ये परिवर्तित केल्या जाणार आहेत. या गाड्यांना किलोमीटरप्रमाणे भाडे दिले जाणार आहे. विटा, तासगाव, जत आदी भागांत या गाड्या सोडल्या जाणार आहेत. एसटीच्या गाड्यांवरील देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी करण्यासाठी हा प्रयोग सुरू केला जाणार आहे. या महिनाअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ही सेवा सुरू होणार आहे. एसटीच्या या वेगळ्या प्रयोगाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.









