रत्नागिरी एक्सप्रेस ब्रेकिंग:- आमदार राजन साळवी यांचे स्विय सहायक सुभाष मालप यांना देखील एसीबीची नोटीस

रत्नागिरी:- कोकणातील ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार वैभव नाईक यांची यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्यात आली. आता आमदार राजन साळवी यांचे शासकीय स्वीय सहाय्यकही एसीबीच्या रडारवर आले आहेत. स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांना अलिबागमधील एसीबीच्या कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांना आलेल्या नोटिसीमध्ये आजच अलिबाग येथील विभागीय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र त्यांना ही नोटीस दुपारी उशिरा मिळाली, अशी माहिती आमदार राजन साळवी यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. ही नोटीस आज दुपारी उशिरा मिळाल्याने आता पत्र लिहून पुढची तारीख तारीख द्यावी, अशी विनंती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदार राजन साळवी यांची राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघातील मालमत्तेची उघड चौकशी सुरू आहे. या अनुषंगाने जबाब नोंदवण्याकरता उपस्थित राहावं, असं या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. आमदार वैभव नाईक यांची चौकशी झाल्यावर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांचे निकटवर्तीयही एसीबीच्या रडारवर आले आहेत.