रत्नागिरी:- बदलत्या रोजगाराच्या संधी आणि उद्योगविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने आता कौशल्याधारित महाविद्यालये सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा जिल्ह्यांमध्ये १२ बहुविद्याशाखीय कौशल्याधारित महाविद्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव अधिसभेने बुधवारी मंजूर केला.
विद्यापीठाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांतील स्थानिक गरजा लक्षात घेऊन या महाविद्यालयांची आखणी केली आहे. स्थानिक उद्योग, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि रोजगाराच्या संधी यांचा अभ्यास करून अभ्यासक्रम विकसित केले जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. प्रस्तावित महाविद्यालयांमध्ये आर्थिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, औद्योगिक स्वयंचलन, विद्युत वाहन तंत्रज्ञान, वाहतूक व बंदर व्यवस्थापन, सागरी अध्ययन, ब्लू इकोनॉमी, मत्स्यव्यवसाय व सागरी जैवतंत्रज्ञान यांसारखे अभ्यासक्रम सुरू हाेणार आहेत. तसेच कृषी व्यवसाय, पर्यटन व आतिथ्य व्यवस्थापन, पर्यावरण व कांदळवन संवर्धन, हवामान बदल अध्ययन, ड्रोन व भौगोलिक माहिती तंत्रज्ञान, डिजिटल आरोग्य, उद्योजकता व नवउद्योग व्यवस्थापन, बांबू व आदिवासी उद्योजकता, आपत्ती व्यवस्थापन यांचाही समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना माेठ्या प्रमाणात संधी उपलब्ध हाेणार आहे.
पारंपरिक अभ्यासक्रमांची रचना बदलून त्यात कौशल्य आणि उद्योजकतेचा समावेश केला जाणार आहे. इतिहास विषयात डिजिटल इतिहास व अभिलेख व्यवस्थापन, सार्वजनिक इतिहास व वारसा पर्यटन, सांस्कृतिक संसाधन व्यवस्थापन, वारसा संवर्धन व पुनर्स्थापना, ऐतिहासिक संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्ता, वारसा क्षेत्रातील उद्योजकता यांसारखे अभ्यासक्रम प्रस्तावित आहेत.
राज्यशास्त्र विषयात डिजिटल जनसमर्थन व प्रचारमोहीम, राजकीय विश्लेषणातील कृत्रिम बुद्धिमत्ता, राजकीय संवाद, राजकीय जोखीम विश्लेषण, धोरण समर्थन व राजकीय प्रभाव व्यवस्थापन आदींचा समावेश केला जाणार आहे.









