रत्नागिरी:- शहरवासीयांना यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. शहरवासीयांना दररोज १९ ते २० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शीळ धरणात पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजे जून महिन्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल इतका साठा उपलब्ध असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
शीळ धरण, पानवल धरण आणि नाचणे येथील तलाव या तीन स्रोतांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ४.३०१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. पावसानंतर काही महिने पानवल धरण आणि नाचणे येथील तलावातून काही महिने शहराला आलटूनपालटून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शीळ धरणावरील ताण कमी होतो; मात्र यंदा नाचणे जलशुद्धीकरण केंद्राचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पानवल आणि नाचणे येथील पाणीपुरवठा बंद आहे. पानवल धरणाची साठवण क्षमता ५०१९ दशलक्ष घन मीटर इतकी आहे. नाचणे तलावातील पाणी पूर्णपणे आटले आहे. पानवल धरणाकडून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करणारे नाचणे जलशुद्धीकरण केंद्र नव्याने उभारले जात आहे. जूनला जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होणार आहे. सुमारे ७३ कोटी रुपये खर्च करून ही पाणीयोजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ३० ते ४० टक्के गळती थांबली आहे.
शहरात १० हजार २८८ नळजोडण्या असून, त्यांना प्रतिदिन १९ ते २० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. पानवल, नाचणे येथील पाणीपुरवठा बंद असल्याने शहराला एकट्या शीळ धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई किंवा दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे संकट येऊ नये यासाठी पालिकेचे पाणी नियोजन सुरू आहे. शीळ धरणात सध्या १.८०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जून महिन्यापर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे यंदा शहरवासीयांची पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.