ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
रत्नागिरी:- शुक्रवारी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात ७२ व्या राष्ट्रीय फिटनेस आणि शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ चा भव्य शुभारंभ होत आहे. राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, देशातील नामवंत शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेत आपला पीळदार देह आणि कौशल्य प्रदर्शित करणार आहेत. या स्पर्धेचे विशेष आकर्षण सुहास खामकर असणार आहे.
उदय सामंत प्रतिष्ठान रत्नागिरी प्रायोजित आणि राष्ट्रीय स्वास्थ्य एवं शरीरसौष्ठव महासंघाच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र हौशी शरीरसौष्ठव संघटना आणि रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरीतील कै. श्रीराम हरी खातू नाट्यमंदिर, गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार १ मे २०२६, सायंकाळी ५:०० वाजता या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किरण सामंत असणार आहेत.
याशिवाय या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी उपस्थित असणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हनुमंत जगताप, प्रसिद्ध उद्योजक रवींद्र (अण्णा) सामंत, नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी खास आकर्षण असणार आहे तो 9 वेळा मि. इंडिया हा किताब मिळवलेला तसेच 2010 चा मिस्टर आशिया, मिस्टर वर्ल्ड आणि मिस्टर ऑलिंपिया अमॅच्युअर, सात वेळा मिस्टर महाराष्ट्र आणि 2010 चा मिस्टर आशिया गोल्ड मेडल विजेता सुहास खामकर हा या या स्पर्धेसाठी रत्नागिरीत हजेरी लावणार आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा २ मे रोजी रात्री ८:०० वाजता संपन्न होईल. रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात या स्पर्धेमुळे एक नवा उत्साह संचारला असून, शरीरसौष्ठव प्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्पर्धा प्रमुख व रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना कार्याध्यक्ष विरेंद्र वणजू व अध्यक्ष सदानंद जोशी यांनी आवाहन केले आहे









