रत्नागिरीत 17 मार्चपासून श्री देव भैरी बुवाचा शिमगोत्सव 

रत्नागिरी:- गुरुवार दि. 17 रोजी रात्री 10 वा. श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिरातून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून गावकरी मानकरी, ट्रस्टी, गुरव मंडळी व ग्रामस्थ मंडळी पारंपारिक पध्दतीत झाडगांव सहाणेवरुन महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्री ठिक 11 वाजेपर्यत जातील.

मध्यरात्री 12 वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्‍वरी भेटीसाठी, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदीरा बाहेर पडेल व खालची आळी, कै. बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर 1.30 वाजेपर्यत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात जाईल. शुक्रवार दि. 18 रोजी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे 3 वाजता श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगांव सहाणेवरुन झाडगांव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदीर, बंदर रोड मार्गे पहाटे 5 वाजता मांडवी भडंग नाका येथे जाईल. तेथून पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार , विलणकरवाडी,चंवडेवठार, खडपेवठार मागील समुद्र मार्गाने खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी 10 वाजता येईल. तेथून तेलीआळी भागातून, राम नाका,राम मंदिर येथे सकाळी 11.30 वाजता येईल तेथून पुढे राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी 12 वाजता येईल तेथून पुढे हॉटेल प्रभा जवळून काँग्रेस भूवन मार्गे -टिळक आळीतून जोगेश्वरी मंदिराजवळ श्री.मनू गुरव यांच्या कंपाऊंडमध्ये होळीचा शेंडा घेण्यासाठी जाईल. तेथून होळीचा शेंडा घेऊन दुपारी 3 वाजेपर्यंत झाडगाव येथे सहाणेवर जावून तेथे होळी उभी केली जाईल. रात्री 9 वाजता धुळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीची निशाण सहाणेवरुन निघेल व सांवतखोत वठारातून पटवर्धन यांच्या घरापर्यंत जावून फिरुन येईल व देवस्थानचे मुख्य खोत रमाकांत गोपाळ सांवत व संतोष आत्माराम सांवत यांच्या घरी जाईल तेथे पूजा-अर्चा होऊन घुळवड श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिरात जाईल तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर कंपाऊड मध्ये जाऊन सुर्वे यांच्या बागेतून शिवलकर वगैरे यांच्या घराजवळून कुभांरवाड्यातून परटवणे फगरवठार येथून परत फिरुन निशाण वरच्या आळीतून , लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालनिच्या पारावर येईल सुमारे रात्री 11.30 वा. ढमालनिच्या पारावरुन निशाणाचे तीन भाग होतील त्यापैकी एक भाग निशाण घेवून गुरव मंडळी श्रीदेव भैरी मंदिरामध्ये जातील. दुसरा भाग गोखले नाक्यावरुन राधाकृष्ण नाक्यावरुन मासळी बाजारापेठ येथे जाईल, तेथे रवी सुर्वे , मयेकर यांचे घराच्या दरम्यान फिरुन मच्छीमार्केटच्या मागील बाजूने झारणी रोड मार्गे राम नाक्यावरुन तेली आळीत रसाळ यांचे घरी तिठ्यावरती येईल. ढमालणीच्या पारावरुन तिसरा भाग निघून पर्‍याची आळी, मारुती आळीतून तेलीआळी येथील रसाळ यांच्या घरी तिठ्यावर येईल. तेथून गोडीबाव नाक्यावरुन श्री देसाई यांचे घरी जावून, खडपेवठार येथे देसाई व विलणकर यांचे शेतातून कै. रघू विलणकर यांचे घरी जाईल तेथून निशाण राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिरात जाईल (सुमारे 1.30वा.) तेथे श्रीदेव विश्वेश्वराच्या हद्दीत फिरुन श्रीदेव विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये गार्‍हाणे होईल व निशाण बाहेर पडेल. तेथून राजीवड्यातील चव्हाण यांच्या घराशेजारी जाईल. तेथे मुस्लीम मानकरी काद्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देवून गळाभेट होईल व तेथे धुळवड साजरी होईल. तेथून निशाण परत फिरुन खडपेवठार सतीजवळून,समुद्र मार्गाने चंवडेवठार नाक्यावरुन,विलणकर वाडी, श्री दत्त मंदिर नाका, घुडेवठार, मांडवी येथे वारंग यांचे घरी रात्री थांबेल.

सकाळी 8 वाजता मांडवी वारंग यांचे घरापासून पुढे चौगुलेवाडी समुद्रमार्गे पौडा वरुन कुरणवाडी, सिध्देश्वर विरेश्वर चव्हाटयाजवळ गार्‍हाणे होईल. तेथून धुळवड आंवुलकर यांच्या घरी जाईल. आंबुलकर यांच्या घरातून सांबमंदिर, जोतिबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होवून एक भाग राममंदिरच्या मागील बाजूने जावून दुसरा भाग राममंदिराच्या पुढिल बाजूने मिरकरवाडा पोलिस चौकीजवळ धुळवडीचे दोन भाग एकत्र येवून तेथून पुढे भैरी मंदिर , सुभेदार यांच्या घराजवळून पाटिल फिशरीज फॅक्टरी जवळून विठलादेवी जवळून ग्रामस्थ शिरधनकर यांच्या घरी जाईल. तेथून मुरुगवाडा घसरवाटेजवळ धुळवडीचे दोन भाग होतील. एक भाग झाडगाव येथील झाडगावकरांच्या कंपाऊंडमध्ये येईल व दुसरा भाग तेथून पुढे पंधरा माड येथील पिलणकर यांच्या घरी जाईल. नंतर मुरुगवाडा हद्दीजवळ जावून तेथे गार्‍हाणे होवून धुळवड परत मागे फिरुन झाडगांव सहाणेजवळील झाडगावकर यांच्या कंपाऊडमध्ये दुपारी 12 वाजता येईल व धुळवडीचा कार्यक्रम संपेल.
शुक्रवार दि. 18 ते 21 मार्चपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत श्रीदेव भैरी ची पालखी झाडगांव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न असेल. तसेच दि.19 ते 21च्या रात्री 10 नंतर प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीत पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल

शुक्रवार दि. 18 ते 21 मार्चपर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत श्रीदेव भैरी ची पालखी झाडगांव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न असेल. तसेच दि.19 ते 21च्या रात्री 10 नंतर प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीत पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल.

सोमवार दि. 21 रोजी दु. 12.00 वा. श्रीदेव भैरीची पालखी मुरुगवाडा ग्रामप्रदक्षिणेसाठी सहाणेवरुन उठेल व झाडगाव मार्गे, श्रीदेवी जोगेश्वरी मंदिर येथून खालची आळी, भैरी मंदिर मार्गे दांडाफॅक्टरीचे मागिल बाजूने मुरुगवाडयातून पंधरा माडापर्यंत जावून परत मागे फिरेल व रात्रौ साधारण 10.00 वाजता झाडगाव सहाणेवर येईल, त्यानंतर सहाणेवर रात्री पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल. मंगळवार दि.22 रोजी श्रीदेव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी 1 वाजता सहाणेवरुन उठेल व पोलिस कर्मचार्‍यांची शस्त्र सलामी घेवून सांवत-खोत वठारातून श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिरातून सहाणेच्या मागील बाजूने झाडगाव नाक्यावरुन गाडीतळ येथे 3.30 वाजेपर्यत येईल, पुढे श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिरात सांय.4.30 वाजता पोहचेल. तेथून पुढे शहर पोलीस स्टेशनला पोहचेल, धनजी नाक्यावरुन , राधाकृष्ण नाक्यावर सायंकाळी 6.30 वा. येईल. पुढे राम नाका, राम मंदिर येथे सांय 7 वा. येईल, पुढे मारुती आळी, गोखले नाक्यावरुन, ढमालनीच्या पारावर रात्री  9 वाजता पालखी येईल. तेथून पुढे विठठल मंदिर, हॉटेल प्रभा, काँग्रेस भूवन, मुरलीधर मंदिर येथे रात्री 10 वाजता पालखी येईल, पुढे खालची आळी मार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रागंणात रात्री 11.30 वाजेपर्यत येईल. रात्री 12 वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल, नंतर धुपारत व गावाचे गार्‍हाणे होवून शिमगा उत्सवाची सांगता होईल