रत्नागिरीत १२४ मालमत्ता सील; १७२ नळजोडण्याही तोडल्या

रत्नागिरी नगरपालिकेकडून १४ कोटीपैकी ११ कोटींची घरपट्टी वसुली

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेच्या वसुली पथकांनी मार्चअखेर १४ कोटी घरपट्टीपैकी ११ कोटी वसुली केली. ८० टक्केच्यावर ही वसुली झाली. या वसुली दरम्यान जप्तीपथकांना अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या कारवाईत १२४ मालमत्ता सील केल्या, तर १७२ नळजोडण्या तोडण्यात आल्या, अशी माहिती पालिकेच्या वसुली विभागाचे अधिकारी नरेश आखाडे यांनी दिली.

रत्नागिरी शहरात सुमारे ३१ हजार २६० घरे, सदनिका, बंगले, दुकाने, गाळे आहेत. यांच्याकडून घरपट्टीची १४ कोटी रुपये करवसुली करण्याचे आव्हान होते. अनेक मालमत्ताधारकांनी पालिकेच्या नागरी सुविधाकेंद्रात रांग लावून भरणा केली; परंतु मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्याकडून ही वसुली करण्यासाठी मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी ८ जप्तीपथके स्थापन केली. प्रत्यक्ष जाऊन या पथकांनी थकीत कर वसुलीसाठी प्रयत्न केले. शहराच्या काही ठिकाणी थकीत कर वसुलीसाठी गेलेल्या जप्ती पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागले. विनंती करूनही कर वसुली होत नसल्याचे पाहिल्यानंतर त्या ठिकाणची नळजोडणी तोडण्यात येत होती. नळजोडणी तोडताना पथकांना जोरदार विरोधाला सामोरे जावे लागले. काही ठिकाणी थकीत करदाते आणि रत्नागिरी पथकाचे अधिकाऱ्यांची यांच्यात बाचाबाचीही झाली. विरोध झुगारून पथकाने थकीत कर वसुली केली. अधिकारी नरेश आखाडे, जितू विचारे, उत्तम पाटील, राजन पवार, सागर सुर्वे आदींनी शांतपणे जास्तीत जास्त वसुली होण्याकडे लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे १४ कोटी रुपयांपैकी ११ कोटी रुपये कर वसुली झाली आहे. त्याचबरोबर १७२ नळजोडण्या तोडण्यात आल्या असून, १२४ मालमत्तांवर जप्तीच्या नोटीस चिकटवण्यात आल्या आहेत.