रत्नागिरीत समुद्रात पडलेली अज्ञात तरुणी अद्याप बेपत्ता

शोध मोहीमेस यश नाही, सुरक्षा यंत्रणांवरही प्रश्नचिन्

रत्नागिरी:- शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ भगवती किल्ल्याजवळील पाणभुयार स्पॉट येथे रविवारी समुद्रात पडलेली एक अज्ञात तरुणी अद्याप बेपत्ता असून, घटनेनंतर २४ तास उलटूनही तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. सोमवारी सकाळपासून पुन्हा एकदा पोलिस व आपत्कालीन पथकांनी शोधमोहीम राबवली, मात्र कोणतीही ठोस माहिती अथवा मृतदेह सापडलेला नाही.

ही दुर्दैवी घटना रविवार, २९ जून रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे २३ ते २५ वयोगटातील एक तरुणी पाणभुयार स्पॉटजवळ सेल्फी घेण्यात गुंग होती. या दरम्यान तिने आपले चप्पल आणि स्कार्फ बाजूला ठेवले आणि रेलिंगच्या पुढे गेली. अचानक तोल जाऊन ती थेट खोल समुद्रात (सुमारे २०० ते २५० फूट) पडली. आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडाओरड केली, मात्र ती काही क्षणांतच खवळलेल्या समुद्रात गायब झाली.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, रत्नदुर्ग माउंटेनियर्स, आणि चिपळूणहून आलेले एनडीआरएफचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फिशरीज विभागाच्या दोन ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र, खवळलेला समुद्र आणि जोरदार वाऱ्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले.

सिसीटीव्ही बंद, सुरक्षेवर गंभीर प्रश्न:
या परिसरात पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी प्रकल्पात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, मात्र या घटनेच्या वेळेस ते सर्व कॅमेरे बंद अवस्थेत होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे संबंधित तरुणीचे हालचाल व ओळख पटवण्यास अडचणी निर्माण झाल्या असून, प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च करून बसवलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे वेळेवर बंद का होते, याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

ओळख अद्याप गुलदस्त्यात:
तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. शहरातील सर्व शासकीय व खासगी वसतीगृहे, शाळा व महाविद्यालयांत पोलिसांनी तपास केला, मात्र कोणतीही बेपत्ता तरुणी असल्याची नोंद सापडलेली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स तसेच पर्यटकांकडून वर्णन मिळवण्याचा प्रयत्न केला, तरीही कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही.

घटनास्थळी गर्दी आणि निष्काळजीपणा:
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने या भागात पर्यटकांची मोठी गर्दी होती. सेल्फी घेण्याच्या नादात अनेकजण सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठिकाणी जात असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. यामुळे प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.

या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा, पर्यटकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता आणि प्रशासनाची सजगता या सर्व बाबींवर प्रश्न निर्माण झाले आहेत. अज्ञात तरुणीचा तपास सुरू असला तरी तिचे नक्की काय झाले याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा उपाययोजना, कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच चेतावणी फलकांची संख्या वाढवणे आवश्यक ठरत आहे.