रत्नागिरी:- वक्फ बोर्डाच्या नावाखाली देशातील सार्वजनिक जागा आपल्या ताब्यात घेण्याचा घाट घेतला जात आहे तर दुसरीकडे लव्ह जिहाद, अंमली पदार्थाच्या माध्यमातून तरूण पिढी बिघडवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. कृती करणारे नव्हे तर चुकीच्या कृतीवर बोलणाऱ्यांना गुन्हेगार ठरवून तुरूंगात डांबले जाते. भारत इस्लामी देश करण्याचे षङ्यंत्र काहींनी रचले असून हिंदू जागृत होत नाहीत तोपर्यंत हीच दशा होत राहणार आहे. धर्म वाचला तरच देश वाचेल. आता हिंदुंनी संघटीत होऊन रस्त्यावर उतरण्याची आवश्यक असल्याचे प्रतिपादन हिंदू जनआक्रोश मोर्च्याच्या प्रवक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी केले.
सोमवारी सकाळी 11 वाजता सकल हिंदु समाजातर्फे मारूतीमंदिर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा आणण्यात आला. हातात भगवे ध्वज घेऊन कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडण्यात आला. या मोर्च्याला मार्गदर्शन करताना श्रीमती काजल हिंदुस्थांनी बोलत होत्या.
रत्नागिरीत हिंदु जागा झाला आहे. ग्रंथालयाच्या जागेत उभी राहिलेली मजार तोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सन 2016 मध्ये दिले. परंतु त्यावर अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही. हिंदुंनी कारवाई करण्याच्या मागणीसाठी मोर्च्या काढण्याचा इशारा दिला. त्यांना परवानगी नाकारण्यात आली. यामागे प्रशासन तर होतेच परंतु काही आपलेही होते. काहींनी मित्रही होते. परंतु हिंदुंच्या दबावामुळे मध्यरात्री परवानगी देण्यात आली. तुम्ही संघटीत झालात तर काहीही अशक्य नाही हे हिंदुंनी लक्षात घेतले पाहिजे असेही श्रीमती हिंदुस्थानी यांनी सांगितले.
आपल्या हक्कासाठी आपल्याच देशात आपल्याला संघर्ष करावा लागतोय तर इतरांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण मिळतेय. याला कारण आपण संघटीत नाही. आपण हिंदु असलो तरी जातीपातीच्या वादात खितपत पडलो आहोत. आता हिंदु म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यक आहे. आपण संघटीत झालो तर आपल्या विरोधात बोलण्याची हिंमत कोणीही करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आज रत्नागिरीत काय चाललेय. लव्ह जिहाद, ड्रग्ज विक्री, बेकायदा मजार केवळ उभ्या रहात आहेत. जेथे मुस्लीम वस्ती नाहीत तेथे मशिद उभारल्या जाताहेत. सरकार त्यांना पाठबळ देतेय. त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. आज देशात पोलीसही सुरक्षित नाहीत. दंडाधिकारी सुरक्षित नाहीत. कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली जाते हे धाडस येते कुठून? याचा विचार हिंदुंनी करण्याची आवश्यक असल्याचे श्रीमती हिंदुस्थांनी यांनी सांगितले.
ज्या मजार विरोधात आज विराट मोर्च्या काढण्यात आला त्या मजारवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा तालुका-तालुक्यातून आंदोलने उभी करा, आपण दबाव टाकल्याशिवाय प्रशासन कारवाई करणार नाही. हिंदुंनी जागे होण्याची हीच वेळ आहे. धर्म वाचला तरच देश वाचेल असे श्रीमती हिंदुस्थांनी म्हणाल्या.
वक्फ बोर्डाच्या विभागीय कार्यालयासह उर्दू भवन रत्नागिरीत उभारण्याचा घाट काहींनी घातला आहे. याला हिंदुंनी प्रखरतेने विरोध केला पाहिजे. आज वक्फ बोर्डाच्या कायद्याचा आधार घेत जागा बळकावल्या जाताहेत. सरकारी जागांवर झेंडे लावून त्या आपल्या ताब्यात घेतल्या जातात. देशातील सर्वाधिक भूपृष्ठ ताब्यात घेऊन भारत हिंदुंचा देश असताना तो इस्लामिक देश करण्याचा घाट काहींनी घातला असल्याचा आरोप श्रीमती हिंदुस्थांनी यांनी केला.
या मोर्च्यात चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे, माजी आमदार बाळासाहेब माने, संतोष पावरी, राजेश तोडणकर, नंदू चव्हाण, प्रशांत डिंगणकर, योगेश हळदवणेकर, सतेज नलावडे, प्रवीण जोशी, संजय निवळकर, सचिन वहाळकर, राजन फाळके यांच्यासह हिंदु बांधव सहभागी झाले होते.