पक्षादेश डावलून अपक्ष निवडणूक लढवणारे परशुराम कदम पक्षातून निष्कासित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता शिवसेनेत मोठी शिस्तभंगविषयक कारवाई केली आहे. युवा सेना कोकण विस्तारक परशुराम मारुती कदम यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील ३५ हातखंबा जिल्हा परिषद गटातून शिवसेनेने श्री. सुयोग नंदकुमार कांबळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, पक्षाचा आदेश डावलून याच गटातून युवा सेनेचे कोकण विस्तारक परशुराम कदम यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी केवळ अर्जच भरला नाही, तर ते अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभे राहून निवडणूक लढवत आहेत.
परशुराम कदम हे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवून पक्ष संघटनेच्या विरोधात काम करत असल्याचे निदर्शनास आले. पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कडक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट नमूद केले आहे की, “परशुराम मारुती कदम यांची पक्षविरोधी कृती लक्षात घेता, त्यांना त्यांच्या सध्याच्या पदावरून मुक्त करण्यात येत असून त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.”
हातखंबा जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासमोर स्वकीयांनीच आव्हान उभे केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र, या हकालपट्टीच्या निर्णयामुळे शिवसेनेने आपल्या कार्यकर्त्यांना ‘शिस्त पाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. या कारवाईमुळे आता हातखंबा गटातील निवडणुकीच्या गणितात काय बदल होतात आणि मतदारांचा कल कोणाकडे झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









