रत्नागिरी:- एकत्र या, एकत्र या.. ‘राज-उद्धव’ एकत्र या.. अशा गगनभेदी घोषणा देत रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
राज्यात हिंदी भाषा सक्तीवरुन मनसे, शिवसेना या पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत हिंदी भाषा सक्ती करु देणार नाही, असा इशाराच दोन्ही ठाकरे बंधूंनी दिला होता. त्यातच ५ जुलै रोजी राज्यव्यापी मोर्चा जाहीर केल्याने सरकार पेचात सापडले होते. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेवून हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली आणि त्यानंतर महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी जल्लोष सुरु केला.
सोमवारी सकाळी रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रामनाका, मारुतीमंदिर, साळवीस्टॉप आदी ठिकाणी शिवसैनिकांनी फटाके वाजवून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना बाळ माने पुढे म्हणाले की, ५ तारखेचा मोर्चा रद्द झाला असला तरी विजयी सभा होणार आहे. जशा वरिष्ठ पातळीवरुन सूचना येतील त्यानुसार ५ तारखेचे नियोजन केले जाईल मात्र हिंदी भाषा सक्ती विरोधात मराठी माणूस एकवटल्याने शासनाला हा निर्णय रद्द करण्यास भाग पडले. हा मराठी एकजुटीचा विजय असल्याचे बाळ माने यांनी सांगितेले.
यावेळी प्रमोद शेरे, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, किरण तोडणकर, मयुरेश्वर पाटील, सलिल डाफळे, बिपीन शिवलकर, सुभाष पावसकर, साजिद पावसकर, हिना दलवी, रमिझा तांडेल, रशिदा गोदड, राजश्री शिवलकर, राजू सुर्वे, शकील महालदार आदी उपस्थित होते.