पंचायत समिती देखील सर्व जागा जिंकत महायुतीकडे
रत्नागिरी:- तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपला शब्द खरा करून दाखवत विजयाचा गुलाल उधळला आहे. तालुक्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा ‘धनुष्यबाण‘ आणि ‘कमळ‘ जोमाने फुलले असून, सर्व 10 जिल्हा परिषद गट आणि 20 पंचायत समिती गणांमध्ये महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निकालामुळे रत्नागिरी तालुक्यात केवळ आणि केवळ महायुतीचाच करिष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत शिवसेनेने आपले संघटनात्मक कौशल्य पणाला लावले होते. जिल्हा परिषदेच्या 10 च्या 10 गटांवर शिवसेनेचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. विशेषत पंचायत समिती गणांमध्ये महायुतीची कामगिरी ऐतिहासिक ठरली. 20 पैकी 18 जागांवर शिवसेनेने मुसंडी मारली, तर 2 जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे, मतमोजणीपूर्वीच महायुतीचा नाणिज गणातील पद्मा कांबळे या एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विजयाची नांदी आधीच झाली होती, ज्यावर सोमवारी लागलेल्या निकालाने मतदारांनी अधिकृत मोहोर उमटवली.
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हती, तर ती राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या राजकीय प्रतिष्ठेची ‘लिटमस टेस्ट‘ होती. विशेषत सामंत यांचे होमग्राउंड असलेल्या हातखंबा-पाली गटातील बंडखोरी आणि गोळपमधील प्रस्थापितांचे आव्हान मोडून काढत महायुतीने रत्नागिरी तालुक्यावर आपला निर्विवाद ताबा मिळवला आहे. 10 जिल्हा परिषद गटांत शिवसेनेने भगवा फडकावला आहे. तालुक्यातील 20 पैकी 18 पंचायत समिती गणांवर शिवसेनेने, तर 2 जागांवर भाजपने विजय मिळवत विरोधकांचे सर्व किल्ले उद्ध्वस्त केले आहेत.
हातखंबा गटात सुयोग कांबळेंचा विजय; परशुराम कदमांचा निसटता पराभव
सर्वाधिक चुरस असलेल्या हातखंबा-पाली या अनुसूचित जातीसाठी आरक्षित गटात पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुयोग कांबळे यांच्यासमोर पक्षातून हकालपट्टी झालेले बंडखोर परशुराम कदम आणि ‘वंचित‘चे मुकुंद सावंत यांचे तगडे आव्हान होते. बंडखोरीमुळे मतांचे विभाजन होऊन ‘गनिमी कावा’ फॅक्टर चालणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्या गटात आपली पूर्ण ताकद झोकून दिली. तालुक्यातील सर्वात चर्चेची आणि प्रतिष्ठेची ठरलेली लढत म्हणजे शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर उमेदवार कदम विरुद्ध महायुती होती. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत परशुराम कदम यांना जनतेने नाकारले आहे. अखेरच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या उत्कंठावर्धक सामन्यात कदम यांना 279 मतांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
गोळपमध्ये ‘जायंट किलर‘ नंदा मुरकर; मातब्बर उदय बने पराभूत
गोळप जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या नंदा मुरकर यांनी इतिहास रचला आहे. गेल्या 25-30 वर्षांपासून स्थानिक राजकारणात दबदबा असलेल्या उदय बने यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करत त्यांनी ‘जायंट किलर‘ ठरण्याचा मान मिळवला. एकाच व्यक्तीच्या अनेक वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून शिवसैनिक काय करू शकतो, हे नंदा मुरकर यांनी दाखवून दिले आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. या निकालाने गोळपमधील जुन्या राजकीय समीकरणांना पूर्णपणे छेद दिला आहे.
जिल्ह्यात एकेकाळी जिल्हा परिषदेत 39 सदस्य असलेल्या उद्धव ठाकरे गटाची अवस्था दयनीय झाली आहे. या निवडणूकीतून त्यांचे अस्तित्व अवघ्या 3-4 जागांवर येऊन ठेपले आहे. रत्नागिरी तालुक्यात तर सोमवारी अंतिम निकालात शिवसेनेने जिल्हा परिषद गटांच्या 10 जागांवर विजय घेत विरोधकांचे दावे फोल ठरवले आहेत. तर पंचायत समिती गणातील 20 पैकी 18 जागांवर शिवसेनेने आणि 2 जागा भाजप अशी मुसंडी मारली. भाजपच्या साथीने महायुतीने मिळवलेला हा विजय जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारा ठरला आहे.
शिवसेना-भाजपा विजयाची अधिकृत घोषणा होताच रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. हा विजय विकासकामांचा आणि महायुतीवरील विश्वासाचा आहे, अशा भावना नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. या विजयामुळे येणाऱ्या काळात तालुक्यातील विकासाची चाके अधिक वेगाने फिरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी रचलेली सर्व रणनीती महायुतीच्या झंझावातापुढे कोलमडून पडली असून, रत्नागिरीवर पुन्हा एकदा भगवा आणि महायुतीचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.
………………………….
पंचायत समिती निवडणूक – रत्नागिरी तालुका
गण – वाटद ,विजयी उमेदवार – संजना माने – भाजप
गण – कळझोंडी, विजयी उमेदवार – अनुष्का खेडेकर – शिवसेना
गण – खालगाव, विजयी उमेदवार -नेहा गवाणकर – शिवसेना
गण – करबुडे , विजयी उमेदवार – प्रवीण धोंडू पांचाळ – शिवसेना
गण -नेवरे , विजयी उमेदवार -पूर्वा दुर्गावळी – शिवसेना –
गण -कोतवडे , विजयी उमेदवार – स्वप्नील मयेकर – शिवेसना
गण – साखरतर, विजयी उमेदवार – परेश सावंत – शिवेसना
गण – झाडगाव (म्यू. बाहेर), विजयी उमेदवार – साक्षी कुमठेकर – शिवेसना
गण – खेडशी, विजयी उमेदवार -वैभव पाटील – शिवेसना
गण – केळये, विजयी उमेदवार – सुमेश आंबेकर – शिवेसना
गण – हातखंबा, विजयी उमेदवार – विद्या बोंबले – शिवेसना
गण – कुवारबाव, विजयी उमेदवार -गजानन धर्माजी धनावडे -शिवेसना
गण – नाचणे, विजयी उमेदवार -सचिन सूपल – शिवेसना
गण – कर्ला, विजयी उमेदवार – कांचन नागवेकर – शिवेसना
गण – हरचिरी, विजयी उमेदवार – संयोग दळी – भाजपा
गण – भाटय़े, विजयी उमेदवार – अर्चना तुषार साळवी – शिवेसना
गण – गोळप, विजयी उमेदवार – नेताजी पाटील – शिवेसना
गण – पावस, विजयी उमेदवार – नामदेव कोकरे – शिवेसना
गण – गावखडी, विजयी उमेदवार – स्वाती शिंदे – शिवेसना
गण – नाणीज, विजयी उमेदवार – डॉ पद्मजा कांबळे-शिवेसना (बिनविरोध)









