रत्नागिरीत शिक्षक पात्रता परीक्षेची जय्यत तयारी

4 हजार 351 उमेदवारांसाठी 10 केंद्रे सज्ज

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी बहुप्रतीक्षित शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रशासनाने या परीक्षेची चोख आणि पारदर्शक व्यवस्था केली आहे. शिक्षक भरतीसाठी अनिवार्य असलेली ही महत्त्वपूर्ण परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात या परीक्षेसाठी एकूण 4 हजार 351 उमेदवार बसणार आहेत. पहिल्या पेपरसाठी 1 हजार 762 तर दुसऱ्या पेपरसाठी 2 हजार 589 उमेदवार परिक्षेकरीता बसणार आहेत. असे एकूण 4 हजार 351 उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा देणार आहेत. या सर्व उमेदवारांसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 10 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष आणि कठोर काळजी घेतली आहे. परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच बारकाईने नजर असणार आहे. उमेदवारांच्या ओळखपत्राची खात्री करण्यासाठी परीक्षा केंद्रावर त्यांचे थम रिडिंग (बायोमेट्रिक स्कॅनिंग) घेतले जाणार आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 350 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

शांतता आणि पारदर्शक वातावरणात ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. परीक्षा परिषदेकडून सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी निर्धारित वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे.