रत्नागिरी:- दिवाळी पुर्वसंध्येसह पहिल्या दिवशी रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठ चांगलीच गजबजलेली होती. सलग दोन वर्षे कोरोनाचा सामना करणार्या व्यापारी यंदा तेजी आहेत. दोन दिवसांनी भाऊबीज असल्यामुळे तोपर्यंत कपडे, भांडी यासह विविध दुकानांमधील गर्दी कायम राहील असा अंदाज वर्तविला जात आहे. लक्ष्मीपूजनामुळे गुरुवारी (ता. 4) सायंकाळपर्यंत बाजारात वर्दळ होती. सायंकाळनंतर धुमधडाक्यात लक्ष्मीची पूजा करत व्यापार्यांनी उत्सव साजरा केला.
गुरुवारी सकाळी रत्नागिरीकरांनी अभ्यंग स्नानाचा आनंद घेत फटाक्यांच्या आतषबाजीत दिवाळीचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. कोरोना आणि महिन्याच्या सुरवातीला आलेल्या दिवाळीमुळे बाजारेपेठत खरेदीसाठी गर्दी बुधवारपासून सुरु झाली. रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत गेले चार दिवस दिवसा ग्राहक हजेरी लावून परतत होते; मात्र आज त्यात वाढ झाली होती. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अनेकांनी खरेदीसाठी बाजारपेठेचा रस्ता धरलेला होता. अरुंद रस्ता असल्यामुळे रामआळी, गोखले नाक्याकडे जाणार्या रस्ता वाहनांसाठी बंद केला होता. दिवाळी साजरी केल्यानंतर रत्नागिरीकर खरेदीसाठी बाजारात उतरलेले होते. कपडे आणि फटाके खरेदीवर लोकांचा सर्वाधिक भर होता. त्यानंतर भेट देण्यासाठीच्या वस्तूंकडे कल होता. गेल्या दोन वर्षातील दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी पहायला मिळाली नव्हती. तुलनेत यंदा फटाक्यांची खरेदी अधिक झाल्याचे व्यापार्यांनी सांगितले. दोन दिवसात बाजारपेठेतील उलाढाल कोटीच्या घरात गेली असेल असा अंदाज व्यापार्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मीपूजन असल्यामुळे व्यापार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. भारतीय संस्कृतीत लक्ष्मी ही समृद्धीची, संपदेची देवता मानली जाते. त्यामुळे दुकानदार, व्यापारी, उद्योजक, सुवर्णकारांनी गुरुवारी सायंकाळी जमा, खर्चाच्या वह्यांचे पूजन केले. फटाक्यांची आतषबाजी करत लक्ष्मीपूजन करण्यात आले. रामआळी, गोखले नाका, धनजी नाका, विठ्ठल मंदिरसह मारुतीमंदिर परिसरातील व्यापार्यांनी आपापल्या दुकानात दिव्यांची रोषणाई केली होती.