खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी शिवाजी स्टेडियम दुमदुमले
रत्नागिरी:- स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे थोर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत बुधवारी ‘राज्य क्रीडा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य क्रीडा दिनानिमित्त छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात विविध खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात खाशाबा जाधव यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात या दिनाचे महत्त्व विशद केले. एम. डी. पाटील यांनी खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर व्याख्यान दिले. हा कार्यक्रम क्रिडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांनी आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी मल्लखांब, कुस्ती आणि योगासनांच्या कसरतींनी सर्वांचे लक्ष वेधले. धनुर्विद्या, तायक्वांदो, कराटे आणि नेमबाजीमध्ये विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर केले. शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या कमावलेल्या देहयष्टीचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली.
प्रात्यक्षिकांनंतर शिवाजी स्टेडियम ते माळनाका अशी भव्य क्रीडा रॅली काढण्यात आली. “खेळ खेळूया, फिट राहूया” अशा घोषणांनी रत्नागिरी शहर दुमदुमले. या रॅलीत रत्नागिरी शहर आणि तालुक्यातील विविध शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या सोहळ्याला रत्नागिरीतील क्रीडा क्षेत्रातील मान्यवर भाई विलणकर, सदानंद जोशी, वामन जोशी, महेश मिलके, समिता झोरे, आनंद तापेकर, शाहरुख शेख, नीलम कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडा अधिकारी गणेश जगताप, सुनील कोळी, ऐश्वर्या सावंत आणि क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.









