रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचा आढावा घेतला असून नुकसानीचा आकडा 10 ते 12 हजार हेक्टरपर्यंत जाईल असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच रत्नागिरीत राज्यातील पहिले पोस्ट कोविड कौन्सिलिंग केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील अल्पबचत सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, पावसामुळे राज्यात खुप मोठे नुकसान झालेेले आहे. कोकणातही त्याची झळ बसलेली असून हरचिरी, चांदेराई येथे प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील आढावा घेतला. त्यामध्ये चारही तालुक्यात प्रत्येकी 1500 ते 2000 हेक्टरपर्यंत भातशेती बाधित झाली आहे. नुकसानीचे पंचनामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावेत अशा सुचना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठकरे मराठवाडा दौरा करणार आहे. कोकणातील माहिती घेण्याच्या सुचना मंत्र्यांना दिल्या आहेत. बाधित शेतकर्यांना तत्काळ मदत देण्यासाठी मागणी करण्यात येईल. हेक्टरी 6,800 रुपयात वाढ करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.
जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक असल्याचे सांगत मंत्री सामंत म्हणाले, जिल्हा कोविड रुग्णालयात 66 रुग्ण उपचार घेत आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महिला रुग्णालय कोविड रुग्णासाठी केले जाईल. याबाबत जिल्हाधिकारी आठ दिवसात कार्यवाही करतील. जिल्हा रुग्णालय नॉन कोविड करण्यात येणार आहे. तत्पुर्वी ते सॅनिटाईज केले जाईल. रत्नागिरी नगरपालिकेने सुरु केलेल्या आरोग्य मंदिर येथील रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरु केले जाईल. राज्यातील ते पहिले रुग्णालय आहे. कोविड झाल्यानंतर रुग्णांना दिसणार्या लक्षणांवरील मार्गदर्शनासाठी हे केंद्र राहील. सर्वसामान्यांना या मार्गदर्शनाची गरज आहे.









