रत्नागिरीत ‘राजीव गांधी तंत्रज्ञान पार्क’ उभारणार 

ना. उदय सामंत; अर्थसंकल्पातून जिल्ह्याला 530 कोटी 

रत्नागिरी;- महाराष्ट्र आणि कोकणाला विकासात्मक ताकद देणारा अर्थसंकल्प काल जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्याला 530 कोटीची निधी मिळाला आहे. एवढेच नव्हे; तर ‘राजीवगांधी तंत्रज्ञान पार्क’ साठी 300 कोटीची तरतूद केली असून 50 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला मंजूर झाले आहेत. त्यामुळे भविष्यात सायन्स टेक्नॉलॉजिसाठी विद्यार्थ्यांना पुणे, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, असे मत उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

झुम अ‍ॅपद्वारे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कोकणाला या अर्थसंकल्पात झुकते माप दिली आहे. रेवस-रेड्डी या सागरी महामार्गासाठी साडे नऊ हजार कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे या मार्गाचे कामाला गती मिळणार असून पर्यटन वाढीला मोठी संधी मिळणार आहे. क्रूझ टर्मिनलसाठी 100 कोटीची तरतूद आहे. यामुळे पर्यटनासाठी मुंबईहुन गोव्याला जाणार्‍या 500 पर्यटकांच्या क्रुझला रत्नागिरीत थांंबा मिळणार आहे. ते एक किंवा दोन तास रत्नागिरीत फिरतील आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघतील. यातून रत्नागिरीत मोठी आर्थिक उलाढाल होण्यास मदत होईल. धुतपापेश्‍वर मंदिर विकासासाठी 100 कोटी, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला 50 कोटी, कुणबी समाजाच्या वसतिगृहासाठी 5 कोटी रुपये, सिंधुरत्न समृद्धी योजनेतून 300 कोटी तरतूद केली आहे.राजीवगांधी तंत्रज्ञान पार्क साठी 300 कोटीची तरतूद केली आहे. त्यापैकी 50 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला मिळणार आहेत. सायन्स टेक्नॉलॉजिसाठी विद्यार्थ्यांना पुणे, हैदराबाद आदी ठिकाणी जावे लागत होत. हा पार्कमध्ये सर्व अभ्यासक्रम चालणार आहेत. जिल्हा नियोजन विकास आराखडा 211 कोटीचा होता. तो आता 250 कोटीचा झाला आहे. सिंचनासाठी सुमारो 530 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामध्ये नाणिज गावात 92 कोटीचा लघु पाटबंधारे प्रकल्प बांधला जाणार आहे. यातून जास्तीत जास्त जमिन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच रस्त्यांसाठी 46 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मनोरुग्णालयातील सेवा, सुविधा, पुरूष-स्त्री कक्ष बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी 3 कोटी 70 लाख रुपये मिळाले आहेत. मिर्‍या धुपप्रतिबंधक बंधार्‍याला 189 कोटी 67 लाख तरतूद केली असून 20 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासह 530 कोटीचा निधी मंजूर झाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.