रत्नागिरी:- रत्नागिरीत राजकारणाची गुन्हेगारी होत चालली आहेत. अंमली पदार्थ, गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या अनेकांना राजकीय पाठबळ मिळत आहे. गुन्हेगारीला राजाश्रय मिळत असल्याने राजकारणाची गुन्हेगारी झाली आहे. याला सत्तेतील राजकीय नेते जबाबदार आहेत, असा सनसनाटी आरोप भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला.
झुम अॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माने म्हणाले, काही दिवसांपासून माझ्या वक्तव्यांची खिल्ली उडवून विषयांतर केले जात आहे. कोरोना महामारीच्या गंभीर परिस्थितीमध्ये प्रत्येक ठिकाणी सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. मात्र आज आम्ही हे म्हटले तर चालेल का, कारण या महामारीत आम्हाला राजकारण आणायचे नाही. जनतेला दिलासा मिळेल यादृष्टीने काम करायचे आहे. परंतु उट-सूट मी चार वेळा निवडून आलो, हे सांगण्याची गरज नाही. सर्वांना माहित आहे. मात्र बाळ मानेचे मताधिक्य देखील कमी झालेले नाही. विधानसभा मतदारसंघात आजही 60 ते 65 हजार मते भाजपची आहेत.
रत्नागिरीतील राजकराणा वाईट दिशेने चालले आहे. राजकारणाची गुन्हेगारी झाली आहे. शहर परिसराचा विचार केला तर धनजीनाका, कोकण नगर, शिरगाव येथील काही पिढ्या अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडून संपल्या. मात्र अजून त्यावर नियंत्रण नाही. मोठ-मोठ्या गुन्ह्यातील लोकांना पाठबळ दिले जात आहे. निवडून आल्यापासून काही लोकप्रतिनिधी दुर्जनांना घेऊन चालले आहेत. मिर्या येथील भारती शिपयार्ड कंपनी सुमारे 5 हजार कर्मचार्यांना रोजगार मिळाला होता. काय झाले आज ती देशोधडीला गेली. त्याबद्दल त्यांना विचाराचे नाही का, कंपनीत चोर्या करणारी यांचीच आणि सिक्युरिटीसाठी यांचीच माणसं. म्हणून राजकारणाची गुन्हेगारी होत चालली आहे आणि गुन्हेगारांना राजाश्रय देण्याचे काम ही राजकीय मंडळी करीत आहे, असा आरोप बाळ माने यांनी केला.