रत्नागिरीत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या पाच जणांवर कारवाई

रत्नागिरी:- शहरातील रस्त्यांवरचा कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या पथकाला विविध अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. कचरा टाकणाऱ्या एखाद्याला पकडल्यानंतर ती व्यक्ती अंगावर धावून येते. त्याचबरोबर काहीजण टाकलेला कचरा पुन्हा उचलून नेत आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना पकडून कारवाई करणाऱ्या पथकाची गस्त संपल्यानंतर पहाटे लवकर उठून रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचेही प्रकार उघडकीस आले असल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षक संदेश कांबळे यांनी सांगितले. आतापर्यंत पाच जणांवर प्रत्येकी ५०० रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

शहरात कचरा उचलण्यासाठी सकाळ, दुपार, रात्रीच्या घंटागाड्या फिरतात. घंटागाड्या येत असतानाही अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी कचरा टाकला जातो. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दोन पथके नेमली आहेत. आरोग्य निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ही दोन पथके रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत शहरभर फिरून कारवाई करत आहेत. नुकतीच ही कारवाई सुरु झाली असून मिरकरवाडा, झारणी रोड, उद्यमनगर या ठिकाणी पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आहे प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान या पथकांना आश्चर्यकारक अनुभव आले आहेत. महाराष्ट्र अविघटनशील घनकचरा नियंत्रण नियम २००६ व उपविधी २०१७ नुसार ही कारवाई केली जात आहे.