रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. युवासेनेचे आक्रमक नेते आणि रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख केदार उर्फ मुन्ना मधुसूदन देसाई यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
मुन्ना देसाई यांनी आपल्या राजीनामा पत्रात ‘वैयक्तिक अडचणी’ असल्याचे कारण नमूद केले असले तरी पाली जिल्हा परिषद गटातून परशुराम कदम यांना नाकारण आलेली उमेदवारी आणि सोमवारी त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर तत्काळ मुन्ना देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात “मी माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे जिल्हाप्रमुख, युवासेना या पदाचा आज रोजी राजीनामा देत आहे,” असे त्यांनी पत्रात स्पष्ट म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, युवासेनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
मुन्ना देसाई हे युवासेनेचा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा आणि सक्रिय चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता युवासेनेची जिल्ह्यातील धुरा कोणाकडे सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हा राजीनामा पक्षश्रेष्ठी स्वीकारणार की त्यांची मनधरणी केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.









