रत्नागिरीत महिन्याभरात पोलिसांकडून 43 लाखांचा दंड वसूल

रत्नागिरी:- सुधारित अधिनियमानुसार ई चलान प्रणालीमध्ये दंड रक्कम 11 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून अद्ययावत करण्यात आली आहे. सुधारित वाहतूक अधिनियमानुसार अंमलबजावणी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दि. 12 डिसेंबर ते 12 जानेवारी 2022 या एक महिन्याच्या कालावधीत विविध प्रकारच्या एकूण 8 हजार 192 केसेस करण्यात आल्या असून एकूण 43 लाख 39 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करण्याबाबत 1 डिसेंबर 2021 रोजी अधिसुचना काढली. या सुधारित अधिनियमानुसार ई -चलान प्रणालीमध्ये दंड रक्कम 11 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्रीपासून  अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळे मोटार वाहन (सुधारणा ) अधिनियम 2019 ई चलान मशीनमध्ये अद्ययावत झाल्यावर या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सुधारित वाहतूक गुन्ह्याच्या दंडाची आकारणी संपूर्ण राज्यात एकाचवेळी पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे.

नवीन मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 नुसार वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालक – मालक यांच्यावरील दंडात्मक कारवाईमध्ये वाढ झालीअसून याआधी कमीत कमी 200 रूपये असलेले तडजोड शुल्क नवीन अधिनियमानुसार पहिल्या अपराधासाठी रूपये 500 आणि दुस-या व त्यापुढील तशाच प्रकारे केलेल्या अपराधासाठी 1500 करण्यात आले आहे.

नवीन अधिनियमानुसार विनाहेल्मेट व दुचाकीवरुन ट्रीपल सीट या अपराधासाठी अनुक्रमे रू. 500 व रू.1000 दंड असून याशिवाय संबंधित वाहन चालक यांचा चालक परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्याबाबतची तरतूद आहे. या शिवाय वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे, रेड सिग्नल जंपिंग, दारू पिऊन वाहन चालवणे, अति वेगाने वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूकीच्या वाहनातून प्रवासी वाहतूक यासारख्या अपराधासाठीही संबंधित वाहन चालक यांचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस विभागाकडून संबंधित विभागाकडे  प्रस्ताव सादर करण्यात येतात. 
या शिवाय चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, धोकादायक रित्या वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे तसेच नो-पार्किंग क्षेत्रात वाहन लावणे या सारखे अपराध विना तडजोडीचे करण्यात आलेले असून अशा वाहन चालकांविरूध्द न्यायालयात खटले पाठविण्यात येणार आहेत.

नियमांचे काटेकोर पालन करा
नवीन अधिनियमानुसार वाहन परवाना नसताना वाहन चालविणे यासाठी वाहन चालविणार्‍या व्यक्तीस रू.5000 आणि परवाना नसलेल्या व्यक्तीस आपले वाहन चालविण्यासाठी देणे यासाठी संबंधित वाहन मालक यांना रू.5000अशी दंडात्मक तरतूद आहे. तरी सर्वांनी विशेषतः पालकांनी याची कृपया नोंद घ्यावी व वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातील याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे