रत्नागिरीत महायुतीचा पेच; ‘सन्मान नाही, तर सक्षम लढाई’

नितेश राणेंचा मित्रपक्षाला स्पष्ट इशारा

रत्नागिरी:- मत्स्य आणि बंदर मंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी रत्नागिरीमधील महायुतीबाबत मोठे आणि थेट विधान केले आहे. रत्नागिरी मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यासच युती मान्य होईल, अन्यथा भाजपचा कार्यकर्ता सक्षम आहे आणि लढण्यासाठी तयार आहे, असा स्पष्ट इशारा त्यांनी युतीच्या मित्रपक्षाला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने ताकद वाढवल्याचा दावा करत, राणे यांनी मित्रपक्षाला भाजप कार्यकर्त्यांना ‘कमी लेखू नये’, ‘हलक्यात घेऊ नये’ आणि ‘धमक्या देऊ नये’ असा दम भरला आहे.

​नितेश राणे यांनी रत्नागिरीतील युतीबाबत बोलताना भाजपच्या वाढलेल्या ताकदीवर जोर दिला. 2019 ते 2024 यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आहे. गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळे आणि आमचे मतदान यामुळे आमची ताकद वाढली आहे. रत्नागिरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी आहेत. नाही झाली तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे. कुणी आम्हाला कमी लेखू नये… कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये.. कुणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये… कुणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायचे असेल तर आम्ही तयार आहोत असा इशारा राणे यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या असून, त्यांना योग्य मान-सन्मान मिळणे गरजेचे आहे, असे राणे यांनी ठणकावून सांगितले.