रत्नागिरीत बंदला संमिश्र प्रतिसाद; बंदसाठी शिवसेना रस्त्यावर 

रत्नागिरी:- ‘हिंदू ह्रदयसम्रट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव साहेब आगे बडो, हम तुम्हारे साथ है’,  ‘शेतकर्‍यांना चिरडणाऱ्या मंत्री पुत्राचा निषेध असो’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी रत्नागिरी शहरात काही सुरु असलेली दुकाने बंद केली. मात्र काही दुकान मालकांनी महाविकास आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली होती. तर सेनाप्रणित रिक्षा संघटनाही बंदमध्ये सहभागी झाली होती.


 शिवसेनेचे  विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, संजय साळवी यांच्यासह शिवसैनिकांनी शहरात रॅली काढून व्यापार्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तर राष्ट्रवादीच्या राजेश सुर्वे, बशिर मुर्तुझा यांनीही व्यापार्यांची भेट घेत बंद चे आवाहन केले. तर राष्ट्रवादीचे निलेश भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत  लखीमपूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर निषेध व्यक्त केला.


 लखीमपूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीने महाराष्ट्र बंद घोषित केला होता. रत्नागिरीत शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेश सुर्वे यांनी सर्व व्यापार्यांना  बंद मध्ये सहभागी होत बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला व्यापार्यांनी चांगला प्रतिसाद दिला.


 रत्नागिरीतील मुख्य बाजारपेठेतील दुकाने १०० टक्के बंद होती. मात्र मुख्य मार्गावरील काही दुकाने सकाळी सुरु होती. याची माहिती मिळताच प्रमोद शेरे, बिपिन बंदरकर, संजय साळवी यांच्यासह शिवसैनिकांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. तर काही दुकाने शिवसैनिकांनी बंद केली. 


राष्ट्रवादीच्या राजन सुर्वे,बशिर मुर्तुझा यांनी व्यापारी महासंघाचे निखिल देसाई, गणेश भिगांर्डे यांची भेट घेत बंदमध्ये सहभागी झाल्याबद्दल व्यापारी संघाचे आभार मानले.तर राष्ट्रवादीचे निलेश भोसले यांनी आपल्या सहकार्यांसह जिल्हा प्रशासनाला निवेदन देत घटनेचा निषेध केला.

महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष बंद मध्ये सहभागी झाले होते. पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांनी संपुर्ण शहरात कडक बंदोबस्त ठेवला होता. शहारात कुठेही अनुचित प्रकार न होता. बंद शांततेत पार पडला.