रत्नागिरीत पारंपारिक मच्छीमार आक्रमक 

पर्ससिन, एलईडी नौकांना पकडणार ; संघर्ष पेटण्याची चिन्हे 

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पारंपरिक मच्छीमार आता आक्रमक झाले आहेत. बंदी आदेश धुडकावून शेकडो पर्ससिन नेट नौका राजरोस मिरकरवाडा बंदरातून बेकायदेशीर मासेमारी करीत आहेत. तसेच एलईडीद्वारे अनधिकृत मासेमारी सुरू आहे. याला पायबंध घालण्यासाठी आता पारंपरिक मच्छीमार मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना घेऊन या नौकांना पकडुन देण्याची आक्रमक भुमिका घेतल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले. त्यामुळे मच्छीमारांमध्ये आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. 

रत्नागिरी तालुका शाश्वत पारंपरिक मच्छीमार संघटनेची महत्त्वाची सभा मिऱ्या येथील नवीन दत्त मंदिरात झाली, यावेळी हा मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पारंपरित मच्छीमार उपस्थित होते. १ जानेवारी २०२३ पासून शासकीय निमयमानुसार पर्ससिननेट मासेमारीला पुर्णपणे बंदी घातली आहे. तरी आज शेकडो पर्ससनिनेट नौका मिरकरवाडा बंदरातुन राजरोस चालु आहेत. अशा नौकांवर स्वतः शाश्वत मच्छीमार संघटना मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्याना घेऊन मिरकरवाडा बंदरान कारवाई केली जाईल. तसेच एलईडी लावुन ज्या पर्ससिन नौका मासेमारी करीत आहेत, अशा नौका मालकांवर शाश्वत मच्छीमार जोमाने आक्रमक होवुन कारवाई करतील. गेल्या वर्षी जेवढया एलईडी लावून मासेमारी करणाऱ्या नौका पकडल्या त्याच्या पाचपट या वर्षी शाश्वत मच्छीमार स्वतः नौका पकडून मत्स्य खात्याच्या ताब्यात देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही अधिवेशनान पारंपारिक मच्छीमारांची बाजू सभागृहात मांडली आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने गुहागरला जावुन आमदार भास्कर जाधव यांचे अभिनंदन करण्यात येणार आहे. तसेच मत्स्य खात्याच्या आशीर्वादाने रत्नागिरीमध्ये बेकायदेशीर पर्ससिननेट मासेमारी आणि एलईडी लावुन होणारी मासेमारी सुरू आहे. या बेकायदेशीर मासेमारीला लगाम घालण्याबाबत आमदार जाधव यांच्याशी चर्चा केली जाणार आहे.