रत्नागिरी:- रत्नागिरी उप परिसरातील प्राणीशास्त्र विभागातील प्राध्यापिका सोनाली मेस्त्री ,आरती दामले तसेच विद्यार्थी हर्षदा मेस्त्री,प्रथमेश आंग्रे,सिद्धी साळवी आणि शर्वरी पांचाळ याना रत्नागिरीतील टिके या गावात पांढऱ्या शिपाई बुलबुलचे दर्शन झाले.नेहमीच्या निसर्ग भ्रमंती दरम्यान एका ठिकाणी कीटक पकडण्यात मग्न शिपाई बुलबुल त्यांनी पहिला.
शिपाई बुलबुल हा घराच्या आजूबाजूची परसबाग,घनदाट वने, झुडपी प्रदेश , बागा,शहरे अशा वैविध्य पूर्ण ठिकाणी आढळणारा पक्षी आहे.याच्या डोक्यावर काळा तुरा तसेच दोन्हीबाजूला गालावर लाल ठळक गोलसर ठिपका असतो. सतत ओरडणारा आणि तितकीच चपळ हालचाल असणारा हा पक्षी साळुंकी पेक्षा आकाराने थोडा लहान असतो. वाटी सारखे गोलसर घरटे करून विणीच्या हंगामात हा पक्षी अंडी घालतो.प्रामुख्याने कावळा , भारद्वाज सारखे पक्षी बुलबुल ची अंडी फस्त करतात.
पांढरा शिपाई बुलबुल म्हणजे त्याच्या मूळ तपकिरी काळसर रंगात झालेला बदल.याला इंग्रजीमधे ल्युसिजम म्हटले जाते.ज्यामधे शरीरावर ठिकठिकाणी नैसर्गिक रंगद्रव्य नष्ट होऊन तो भाग पांढरा दिसू लागतो.जनुकीय पातळीवर व परिणामी जैवरासायनिक पातळीवर झालेल्या बदलामुळे ही प्रक्रिया होते. पांढर्या रंगामुळे निसर्गाशी साधर्म्य साधणे ह्या बुलबुलला कठीण जाते त्यामुळे इतर पक्षांकडून धोका निर्माण होण्याची शक्यता असते असे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे.अशा पद्धतीने पक्षांमध्ये ल्यूसिजम दिसणे ही दुर्मिळ गोष्ट आहे.रत्नागिरी उप परिसरातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी ही दुर्मिळ गोष्ट कॅमेरात टिपली आहे. क्षेत्रभेटी आणि पक्षीनिरीक्षण साठी नेहमी प्रोत्साहन देणारे उप परिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर तसेच सहाय्यक कुलसचिव श्री. अभिनंदन बोरगावे यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.