रत्नागिरीत नगराध्यक्ष पदासाठी अटीतटीचा सामना रंगण्याची शक्यता

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत अटीतटीचा सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या शिल्पा सुर्वे आणि उबाठा सेनेच्या शिवानी माने यांच्यात थेट लढत रंगणार आहे. दोन्ही गटाकडून विजयाचा दावा करण्यात आला असला तरी आज होणाऱ्या मतदानानंतर खरे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता अधिक आहे.

शहरात 69 मतदान केंद्रांवर होणार मतदान
रत्नागिरी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. मतदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व तयारीला अंतिम रूप देण्यात आले आहे. शहरातून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतपेटय़ा आणि आवश्यक मतदान साहित्य 69 मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले. यामुळे आज 2 डिसेंबर रोजी होणाऱया मतदानाचा मार्ग मोकळा झाला असून, शहरातील नागरिक मतदानासाठी उत्सुक आहेत.

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन मागील अनेक दिवसांपासून तयारी करत होते. याच तयारीचा एक भाग म्हणून, आज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून 69 मतदान केंद्रांसाठी मतपेटय़ा, ईव्हीएम मशीन्स, मतपत्रिका आणि इतर आवश्यक साहित्य निवडणूक अधिकाऱयांया ताब्यात देण्यात आले. नगर परिषदेतून मतपेटय़ांचे वाटप निश्चित केलेल्या केंद्रावरून सुरू झाले. यावेळी मतदान साहित्य घेऊन जाणाऱया वाहनांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर मतपेटय़ा आणि साहित्य पोहोचवण्यासाठी निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या टीमने विशेष काळजी घेतली.