रत्नागिरीत दोन नव्या गणांची वाढ; नाव बदलाने संभ्रम 

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या बावीस गणांसाठी गुरुवारी आरक्षण काढण्यात आले. यामध्ये वाटद गण अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. यावेळी गणांमध्ये अनेक फेरबदल झाले असून, त्यांची नावेही बदलली आहे. जयगड, खालगाव, ओरी, करबुडे, पडवेवाडी, झाडगाव म्यु. हद्दीबाहेर, साखरतर, नाचणे व कुवारबाव गण सर्वसाधारण झाल्यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिवसेना आणि आ. सामंत यांचा शिंदे गट यामुळे अनेकजणांना उमेदवारीची लॉटरी लागणार आहे.

गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्व. शामराव पेजे सभागृहात पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार शशिकांत जाधव, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरक्षणासाठी बरखा सर्फराज संदे या छोट्या बालिकेने चिठ्ठ्या काढल्या.

सर्वप्रथम अनुसुचित जातीसाठी गण निश्चित करण्यात आला. यापूर्वी नाणिज हा गण  अनुसूजित जातीसाठी आरक्षित होता. या गणाच्या खालोखाल सर्वाधिक लोकसंख्या वाटदमध्ये असल्याने हा गण आरक्षित करण्यात आला. तालुक्यात अनुसुचित जमातीची लोख संख्या कमी असल्याने गण आरक्षित करण्यात आला नाही.त्यानंतर  नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पाच गणांमध्ये आरक्षण काढण्यात आले. चिठ्ठ्या उचलून ते निश्चित करण्यात आले. यात नाणीज, खेडशी व हरचिरी हे गण नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी केळ्ये व कर्ला हे दोन गण निश्चित करण्यात आले.

सर्वसाधारण महिलांसाठी कोतवडे, भाट्ये, गोळप, गावखडी, वरवडे-खारवीवाडा, पावस व हातखंबा हे गण  निश्चित झाल्याने खुल्या गटासाठी जयगड, खालगाव, ओरी, करबुडे, पडवेवाडी, झाडगाव म्यु. हद्दीबाहेर, साखरतर, नाचणे व कुवारबाव हे गण निश्चित झाले आहे. नऊ  गणांमध्ये खुल्याप्रवर्गातील अनेक पदाधिकार्‍यांनी आतापासूनच ‘फिल्डींग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
या आरक्षण सोडतीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी, बाबू मयेकर, मिलींद खानविलकर, अभय खेडेकर यांच्यासह सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.