रत्नागिरी:- अडीच महिन्यांपूर्वी शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावर इलेक्ट्रिक पोलला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातातील जखमी चालक तरुणाचा उपचरांदरम्यान गुरुवारी मध्यरात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.
रत्नदिप रणजित खेतले (24,रा.निवखोल,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वा.सुमारास रत्नदिप खेतले आपल्या ताब्यातील पल्सर दुचाकी (एमएच-08-बीए-2850) वर पाठीमागे त्याचा मित्र रुद्र थुल (रा.निवखोल,रत्नागिरी) याला बसवून अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाठीमागील रस्त्याने विश्वनगर येथे जात होता. त्यावेळी भरधाव दुचाकीवरील त्याचा ताबा सूटला आणि दुचाकी तेथील रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोलला धडक हा अपघात झाला. यात रत्नदिपच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्याठिकाणी उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला कोल्हापूरला नेण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार घेतल्यानंतर मंगळवार 23 डिसेंबर रोजी रत्नदिपला कोल्हापूर येथून घरी सोडण्यात आले होते. दरम्यान, गुरुवार 25 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वा.सुमारास रत्नदिपला श्वास घेण्यास त्रास होउ लागल्याने त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू मध्यरात्री 1.10 वा.सुमारास वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रत्नदिपला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









