५० हून अधिक लाभार्थ्यांची तपासणी
रत्नागिरी:- मानसिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘दि. बॅनयन’ संस्थेच्या रत्नागिरी शाखेने ‘समता फाउंडेशन, मुंबई’ यांच्या सहकार्याने शांतीनगर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ५० हून अधिक मानसिक आरोग्य लाभार्थी आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून या सुविधेचा लाभ घेतला.
१९९२ पासून कार्यरत असलेली ‘दि. बॅनयन’ संस्था २०१९ पासून रत्नागिरीत आपली सेवा देत आहे. केवळ मानसिक आरोग्यच नव्हे, तर लाभार्थ्यांचे शारीरिक आरोग्यही सुदृढ राहावे, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, मोफत चष्मा वाटप आणि डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरीचे नेत्ररोग अधिकारी डॉ. संदीप उगवेकर आणि समता फाउंडेशनचे (रत्नागिरी-सिंधुदुर्ग झोन) आरोग्य अधिकारी श्री. नितीश शेट्ये यांनी विशेष तांत्रिक व वैद्यकीय सहकार्य केले.
या प्रसंगी संस्थेच्या रत्नागिरी प्रोग्राम लीड श्रीमती अरुणा नारायण आणि एचआर प्रशासकीय कार्यकारी (महाराष्ट्र) श्रीमती ममता जाधव यांनी समता फाउंडेशन व जिल्हा रुग्णालयाचे आभार मानले.
”अशा उपक्रमांमुळे आरोग्यसेवा आणि सामुदायिक मानसिक आरोग्य सेवा समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत सहज पोहोचतात. सर्वांगीण आरोग्य सुधारणे हेच आमचे ध्येय आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती मेघा अमोल पवार, नर्स कोऑर्डिनेटर श्रीमती कोमल मडव, श्रीमती रेश्मा पालकर आणि इतर सहकारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.









