रत्नागिरीत दहीहंडीचा माहोल रंगलाच नाही 

ना हंड्या उभ्या राहिल्या…ना गोविंदा आले 

रत्नागिरी:- दरवर्षी डीजेच्या तालावर… गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात… ढाक्कूमाक्कूमच्या तालावर लागणारे थरावर थर. अवघ्या काही मिनिटात उभे राहणारे मनोरे पाहण्यासाठी गर्दी करणारे रत्नागिरीकर आणि रात्री उशिरा पर्यंत रंगणारा हा थरार यावर्षी मात्र कोरोनाच्या सावटाखाली झाकोळला गेला. यावर्षी ना हंड्या उभ्या राहिल्या ना गोविंदा आले, रत्नागिरीत कोरोनाच्या भीतीपोटी दहीहंडीचा माहोल रंगलाच नाही. 

दरवर्षी जिल्ह्यात तीन हजारापेक्षा अधिक दहीहंड्या उभ्या राहतात. हंड्या फोडायला गावागावातून गोविंदा पथक येतात. मागील काही वर्षांपासून दहीहंडी स्पर्धा म्हणून साजरी होऊ लागल्याने यात अधिक रंगत येऊ लागली होती. यावर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटाने सर्वच क्षेत्राची मोठी हानी केली आहे. दहीहंडीला देखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. 
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दहिहंड्यांमध्ये मोठी घट झाली. जिल्ह्यात २४७ ठिकाणी सार्वजनिक १५२० ठिकाणी खासगी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यासाठी परवानगी मागण्यात अली होती. गतवर्षी ३ हजार ४० ठिकाणी हंडी  बांधण्यात आल्या होत्या. यावर्षी यामध्ये निम्म्याने घट झाली आहे. बदललेल्या नियमांसह कोरोनाच्या दहशतीने अनेक आयोजकांनी या स्पर्धेतून माघार घेतली. 

दरवर्षी दहीहंडी हा उत्सव सण म्हणून साजरा करण्याची पध्दत आहे. या सणाचा फायदा घेण्यासाठी राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्याने या सणाला मागील काही वर्षांपासून व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. दहीहंड्यांकरीता मोठ्या रक्कमेच्या बक्षीसांसह मराठी आणि काही ठिकाणी चित्रपटसÉष्टीतील तार्यांच्या उपस्थितीने मागील काही वर्षांपासून या सणाला ग्लमर प्राप्त झाले होते.  मात्र यावर्षी  या सर्वाला ब्रेक लागला आहे. कोरोनामुळे यावर्षी हंडीची स्पर्धा रद्द झाली आहे. तर दरवर्षी प्रमाणे यावर्षी दहीहंडीचा जल्लोष अनुभवायला मिळालाच नाही.