रत्नागिरी:- नव्या रचनेनुसार रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे ११ गट तर पंचायत समितीचे २२ गण झाले आहेत. नव्या रचनेमुळे एक गट आणि दोन गणांची भर पडली आहे. यामध्ये खालगाव, झाडगाव (पालिका हद्दिच्या बाहेर), कुवारबाव हे तीन गट नव्याने करण्यात आले आहेत. मिरजोळे, हरचेरी हे जिल्हा परिषद गट नव्या रचनेत पूर्णतः नष्ट झाले आहेत. या गटातील गावे अन्य गटांमध्ये वर्ग करण्यात आली आहेत.
गट, गणांची नवीन रचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी नुकतीच जाहीर केली. सध्या जाहीर केलेल्या रचनेला ८ जूनपर्यंत हरकत घेण्याची मुदत देण्यात आली आहे. नव्या गट रचनेनुसार ३३ क्रमांकांच्या वाटद गटात जयगड, साखरमोहल्ला, कासारी, गुंबद, सत्कोंडी, सैतवडे, जांभारी, नांदीवडे, रिळ, आगरनरळ, गडनरळ, कळझोंडी, वाटद, चाफेरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ३४ क्रमांकाच्या खालगाव गटात देऊड, चवे, बोंड्ये, राई, खालगाव, चाफे, विल्ये, तरवळ, लाजुळ, उक्षी, रानपाट, ओरी, धामणसे तर ३५ क्रमांकाच्या कोतवडे गटात मालगुंड, गणपतीपुळे, वरवडे, निवेंडी, भगवतीनगर, कोतवडे, जांभरूण, खरवते, वेतोशी, नेवरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. करबुडे (३६ क्रमांक) गटात फणसवळे, मजगाव, दांडेआडोम, पिरंदवणे, केळ्ये, काळबादेवी, बसणी, करबुडे, भोके, निवळी तर ३७ क्रमांकाच्या हातखंबा गटात हातखंबा, चरवेली, वेळवंड, कापडगाव, पाली, साठरे, कशेळी, खानू, नाणिज, वळके या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. क्रमांक ३८ च्या खेडशी गटात खेडशी, पानवल, झरेवाडी, मिरजोळे तर ३९ क्रमांकाच्या झाडगाव म्युनिसिपल हद्दीबाहेर गटात शिरगाव, कासारवेली, मिर्या, सडामिर्या या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४० क्रमांकाच्या नाचणे गटात कर्ला, सोमेश्वर, टेंभ्ये, पोमेंडी खुर्द, नाचणे असून ४१ क्रमांकाचा कुवारबाव हा गट नव्याने निर्माण करण्यात आला आहे. त्यात पोमेंडी बुद्रुक, हरचेरी, चांदेराई, चिंद्रवली, कुरतडे, टिके या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४२ क्रमांकाच्या गोळप गटात भाट्ये, फणसोप, तोणदे, कोळंबे, गोळप, चांदोर, निरूळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ४३ क्रमांकाच्या पावस गटात पावस, डोर्ले, शिवारआंबेरे, नाखरे, मावळंगे, गावखडी, पूर्णगड, गणेशगुळे, मेर्वी, गावडेआंबेरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
वाटद गटात जयगड, वाटद या दोन गणांची निर्मिती झाली आहे. खालगाव गटात खालगाव, ओरी, कोतवडे गटात वरवडे खारवीवाडा, कोतवडे, करबुडे गटात केळ्ये, करबुडे, हातखंबा गटात नाणिज, हातखंबा, खेडशी गटात पडवेवाडी, खेडशी, झाडगाव म्युनिसिपल बाहेर गटात साखरतर, झाडगाव म्युनिसिपल शेजारील, तर नाचणे गटात कर्ला, नाचणे, कुवारबाव गटात हरचेरी, कुवारबाव, गोळप गटात भाट्ये, गोळप, पावस गटात गावखडी, पावस हे गण आहेत. नव्या गट, गण रचनेमुळे जुन्या गट, गणांमधील गावे लांबच्या गट, गणात समाविष्ट झाल्याने इच्छुक उमेदवारांचा हक्काचा मतदार विभागला गेला आहे. हरचेरी, मिरजोळे गटातील मतदार अन्य तीन गटात विभागले गेल्यामुळे तेथील इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना अन्य मतदारसंघ शोधावे लागणार आहेत.