रत्नागिरी:- शहरामध्ये काही महिन्यांपूर्वीच कोट्यवधी खर्च करुन नव्याने केलेल्या रस्त्यांना या पावसाळ्यामध्येही खड्डे पडल्याने लाली आली आहे. अनेक ठिकाणी जांभ्या दगडाने खड्डे भरले जात असल्याने, रस्ते लाल झाले आहे. निकृष्ट कामाबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील मुख्य रस्ते व विविध भागांमध्ये गतवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात रस्त्यांना खड्डे पडल्याने नागरिकांचे मोठे हाल होत होते. पावसाळा संपल्यानंतर कोट्यवधी रुपये खर्च करुन नवे डांबरी रस्ते बनवण्यात आले होते. परंतु या पावसाच्या सुरवातीलाच मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांनाही खड्डे पडू लागले आहेत. या पडलेल्या खड्ड्यांना जांभ्या चिर्याने भरले जात असल्याने रस्त्यावर चिखल होत असून, नव्या रस्त्यांना लालमातीची लाली आली आहे. मारुती मंदिर, परकार हॉस्पीटल समोरील भागासह शहराच्या अंतर्गत भागातही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. डांबरीकरण केलेल्या रस्त्यांनाच खड्डे पडल्याने नागरिकांमधूनही आता नाराजी व्यक्त होत असून नगर परिषदेच्या कारभाराबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.









