रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मिठाई विक्रेते, किराणा दुकान आदी आस्थापनांवर कारवाई सुरू झाली आहे. मारुती मंदिर येथील हिरापन्ना मिठाईवाला तसेच त्याजवळील एक हॉटेल यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याने आस्थापना बंद करण्याचे निर्देश देऊन प्रत्येकी ११,००० रूपये दंड वसूल करण्यात आला. शुक्रवारी शहरात एक हॉटेल व पाच दुकानांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील मारुती मंदीर नजीक एका स्वीट मार्ट येथे ग्राहकांची गर्दी झाल्याने दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे एस. टी. स्टँडजवळील राधेश्याम स्वीटमार्ट, रुची स्वीटमार्ट व स्वरूप स्वीटमार्ट यांच्याकडेही गर्दी असल्याने शासन नियमाच्या उल्लंघनामुळे दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील गोखले नाका येथील हनुमान स्वीटमार्ट यांच्याकडूनही नियमांचे उल्लंघन झाल्याने दुकान बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे करण्यात आली.