रत्नागिरी:- शहराजवळील पांढरा समुद्र येथे गरीने मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांना ट्रायपॉड जातीचा रंगीत मासा सापडला आहे. केंड, ट्रिगरफिश सारख्या माशांच्या प्रजातीशी निगडीत ट्रायपॉड हा मासा आहे. तो ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशिया येथील किनार्यावर आढळतो. नुकत्याच झालेल्या वादळामुळे बदलत्या प्रवाहाबरोबर तो कोकण किनारी आला असावा असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
रत्नागिरीतील तरुण प्रशांत आयरे हे पांढरा समुद्र येथे गरीने मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांच्या गरीला तिन रंगीत मासे लागलो. आठ ते नऊ इंच लांबीच्या त्या रंगीत माशांचे तोंड उभट घोड्याच्या आकारासारखे होते. प्रयोगशाळेत वापरल्या जाणार्या ट्रायपॉडसारखे त्याला तिन कोट आहेत. एक काटा माशाच्या पराशेजारी आणि दोन पोटाच्या भागाजवळ असतात. विचित्र माशांचा आकार पाहिल्यानंतर तरुणांमध्येही कुतूहलता जागृत झाली. सोशलमिडीयावर या रंगीत माशांचे फोटो झळकू लागले. याबाबत माशांवर संशोधन करणार्या डॉ. स्वप्नजा मोहिते म्हणाल्या की, पांढरा समुद्र येथे सापडलेला रंगीत मासा केंड, ट्रीगर फिश (काळतोंडा) या प्रजातीमधील आहे. त्याची त्वचा कडक असते. त्यांच्या पंखाजवळ एक काटा असतो आणि बाजूला दोन काटे असतात. ट्रायपॉडसारखा दिसत असल्यामुळे त्याला ते नाव पडलेले आहे. कोकण किनारपट्टीवर या प्रकारचे मासे विरळच आहेत. ते मासे कोरल रिफच्या जवळ राहतात. त्याच्या तोंडाची रचना खाद्य खरवडून खाण्यासाठी पुरक आहे. वालुकामय किनार्यांवरही त्याचे वास्तव्य असते. रत्नागिरी जिल्ह्यात अशाप्रकारचा मासा आढळल्याची नोंद नाही. गेले काही दिवस वादळामुळे समुद्र खवळलेला असून प्रवाहाबरोबर हे मासे कोकण किनार्याकडे वळेल असल्याची शक्यता आहे. ते विषारी माशांमध्ये मोडतात. त्यांच्या काट्यात विष असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते हाताळले त्याचा प्रभाव जाणवू शकतो.









