रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे, निवेडी परिसरात मंगळवारी रात्री अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. या पावसामुळे आंब्याच्या देठाजवळ पाणी साचून ॲथ्रॅक्सनोजचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच आंब वेगाने तयार होईल. मात्र आज कडकडीत उन पडल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पाऊस पडले असा अंदाज वर्तविला आहे.
गेले महिनाभर जिल्ह्यात उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले होते. दिवसा कडकडीत उन आणि रात्री गारवा या वातावरणामुळे हापूस तयार होण्याच वेग कमी झालेला होता. काल सायंकाळपासूनच पाऊस पडण्याची स्थिती होती. रात्री 8.15 वाजण्याच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट सुरु झाला. विजाही चमकू लागल्या. वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळू लागल्या. संगमेश्वर तालुक्यातील तुरळ, गोळवली राजवाडी, धामणी , शास्त्रीपूल, कडवई या भागात अवकाळी पाऊस कोसळला. तसेच रत्नागिरी तालुक्यात वरवडे, खंडाळा, मालगुंड, चाफेसह खाडीकिनारी भागात जोरदार पाऊस झाला. अर्ध्या तासाहून अधिककाळ पाऊस पडत राहिल्यामुळे त्याचा परिणाम हापूसवर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. अवकाळी पाऊस रात्री पडल्यामुळे हापूसच्या देठाजवळ पाणी साचून राहते. त्यामुळे फळावर अॅथ्रक्सनोजचा प्रादुर्भाव होतो. अनेकवेळा फळावर काळे डाग पडण्याची भितीही असते. हे परिणाम पुढील दहा ते बारा दिवसात दिसून येतात. त्यासाठी बागायतदारांना औषधफवारणी करावी लागते. त्यामुळे औषधांचा खर्च वाढणार आहे. अन्यथा डागी आंबा बाजारात आला तर त्याला दर मिळत नाही. त्यामुळे बागायतदार बुरशीनाशकाची फवारणी करतात. मात्र या पावसामुळे काहीवेळा आंबा वेगाने तयार होऊ लागतो. पुढील काही दिवसात बाजारातील आवकही वाढणार आहे.









