रत्नागिरीत अपक्षांचा चक्काजाम, उमेदवारांना फुटला घाम

नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी 25 अपक्ष मैदानात

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नुकतेच अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप देखील करण्यात आले. यामध्ये बहुसंख्य अपक्ष उमेदवारांना नारळ निशाणी भेटली आहे. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रोशन फाळके आणि विकास पाटील यांनी नारळ निशाणीवर मोठा चमत्कार घडवत विजय संपादन केला होता. आता अनेक अपक्षांनी देखील नारळ निशाणीवर जादुई विजय संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

रत्नागिरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासह 32 नगरसेवक पदांसाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी तीन उमेदवार राष्ट्रीय पक्षाचे तर तीन अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय नगरसेवकांच्या 32 पदांसाठी 25 अपक्षांनी दंड थोपटत मैदानात उतरण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे या 32 पैकी अनेकांना निशाणी नारळ चिन्ह मिळाल्याने अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रोशन फाळके आणि विकास पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. नारळ चिन्हावर लढत या दोघांनी देखील दाखल घ्यायला लागेल असा विजय मिळवला होता. आता या सार्वत्रिक निवडणुकीत अनेकांना नारळ चिन्ह मिळाले आहे. यामध्ये प्रभाग एक मधील अपक्ष उमेदवार अनिकेत वालम यांना नारळ चिन्ह मिळाल्याने या प्रभागात एका जागेसाठी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. याशिवाय प्रभाग 14 मध्ये आशिष मोरे आणि प्रभाग 15 मध्ये संकेत चवंडे यांना नारळ चिन्ह मिळाले असून यामुळे इथल्या लढती देखील रंगतदार होण्याची शक्यता आहे. प्रभाग 3 मध्ये मतीन बावानी यांना देखील नारळ चिन्ह मिळाले आहे.