रत्नागिरीतून 21 डझनाची पहिली पेटी लंडनमध्ये

एंटरप्रायझेस युके आणि ग्लोबल कोकण यांचे प्रयत्न

रत्नागिरी:- लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस युके आणि ग्लोबल कोकण यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी हापूसची 21 डझनची पहिली कन्साईनमेंट लंडनमध्ये दाखल झाली.  मुहूर्ताच्या पहिल्या डझनला 51 पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार 5 हजार रुपये विक्रमी दर मिळाला.

यंदाचा आंबा हंगाम प्रतिकुल असला तरीही रत्नागिरी हापूसची जास्तीत जास्त निर्यात व्हावी यासाठी संयज यादवराव यांच्या ग्लोबल कोकण संस्थेने पावले उचलली आहेत. या संस्थेच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातील तीन बागायतदारांकडील आंबा मुंबईतील निर्यातदाराकडे पाठविण्यात आला. वाशी येथील पणन मंडळाच्या पॅक हाऊसमध्ये त्यावर प्रक्रिया करण्यात आली. युरोपसाठी उष्णजल प्रक्रिया अत्यावश्यक असते. मुंबईतून हवाई मार्गे 21 डझन हापूसचे बॉक्स लंडनकडे रवाना झाले. लंडनमधील भोसले एंटरप्रायझेसचे तेजस भोसले यांच्याकडे 21 फेब्रुवारीला हापूस पोचला. तेजस हे लंडन मध्ये राहत असून गेली अनेक वर्षे हापूसची विक्री करत आहेत. गतवर्षी कोरोनाच्या परिस्थितीतही हापूस त्यांनी निर्यात केला होता. यंदा आंब्यासाठी प्रतिकुल परिस्थिती आहे. तरीही बागायतदार योग्य व्यवस्थापन करुन आंबा बाजारात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या मुंबईतील वाशी मार्केटमध्ये गतवर्षी पेक्षा कमी पेट्या जात आहेत. वातावरणामुळे यंदाचा हंगाम अडचणीत आहे. या प्रतिकूल परिस्थितीत आंबा निर्यातीवरही सावट आहे. त्यामध्येही रत्नागिरीचा हापूस निर्यात झाला आहे. 

पहिल्या एक डझनच्या पेटीला 51 पौंड तर अन्य 20 डझनला प्रत्येकी 30 पौंड दर मिळाला.  पौंडला भारतीय चलना नुसार सध्या 101 रुपये मिळतात. यापुर्वी जास्तीत जास्त 18 ते 20 पौंड डझनला मिळत होते. यंदा अधिकचा दर राहिला तर त्याचा फायदा आंबा बागायतदार यांनाही होऊ शकतो.